देहूरोड : बाजारपेठेतील महात्मा गांधी प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस अनधिकृत इमारतीत सुरू असलेल्या रुग्णालयाकडून शाळेच्या आवारात रुग्णवाहिका लावणे, शाळेच्या भिंतीवर बेकायदा रुग्णालयाचा फळक रंगविणे आदी प्रकार केले जात असल्यामुळे संबंधित रुग्णालयावर आवश्यक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य विशाल खंडेलवाल यांनी बोर्डाच्या विशेष बैठकीत केली. त्याला अन्य सदस्यांनीही दुजोरा दिला आहे.
नियमबाह्य सर्वच रुग्णालयांवर कारवाई
महात्मा गांधी शाळेच्या मागील बाजूला पाच मजली अनधिकृत इमारत उभारण्यात आली असुन या इमारतीत खासगी रुग्णालय सुरू आहे. रुग्णालयासाठी आवश्यक वाहनतळ, रुग्णवाहिकेसाठी पुरेसी जागा उपलब्ध नसताना हे रुग्णालय चालविले जात आहे. रुग्णालयाच्या समोरच बोर्डाची प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या उजव्या बाजुकडील इमारत वर्षभरापुर्वी दुरुस्तीसाठी पाडण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी मोकळ्या झालेल्या जागेत रुग्णालयाची रुग्णवाहिका लावली जात होती. यासंदर्भात तक्रारी आल्यामुळे या वॉर्डातील कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य विशाल खंडेलवाल यांनी तातडीने या रुग्णालयावर आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली. यावर बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ.पी. वैष्णव म्हणाले, अशाप्रकारची कारवाई करताना स्थानिक वॉर्ड सदस्यांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. बेकायदेशीर कुठलीही बाब खपवून घेतली जाणार नाही. आवश्यक ती कारवाई करताना अशा प्रकारे नियमबाह्य असणार्या सर्वच रुग्णालयांवर कारवाई करावी लागेल. त्यात कुठल्याही प्रकारचा पक्षपात होणार नाही, याची प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाईल, असे यावेळी ब्रिगेडियर वैष्णव म्हणाले.