पिंपरी : पिंपरीगावात एका अनधिकृत इमारतीवर विनापरवाना टॉवर उभारण्यात आला आहे. हा धोकादायक टॉवर महापालिकेने त्वरीत काढावा. यापूर्वी अनेकदा महापलिकेकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. मात्र महापालिकेने त्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे आयुक्तांनी हा टॉवर लवकरात लवकर काढून टाकावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे, सत्यवान कुदळे, साहेबराव कुदळे, अजय कुदळे, नंदू कुदळे, रामदास वाघेरे यांनी आयुक्त हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
नागरिकांच्या आरोग्यास धोका
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरीगावात पॉवर हाऊस चौक येथे एक अनधिकृतपणे इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीवर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता टॉवर उभारण्यात आला आहे. या टॉवरमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. विद्युत व ध्वनी लहरींमुळे लहान मुले व जेष्ठांना गंभीर आजार होऊ शकतो. महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनवर तक्रार करून देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे स्वत: लक्ष घालून अनधिकृत टॉवरवर कारवाई करावी.