अनधिकृत नळजोडांवर होणार कारवाई

0

दिवाळीनंतर धडक मोहीम; 35 हजारांपेक्षा अधिक अनधिकृत जोड

पुणे : सोमवारपासूनच पाणीकपातीची घोषणा केल्यानंतर आता महापालिका प्रशासन अनधिकृत नळजोडांवर कारवाईचा बडगा उचलणार आहे. दिवाळीनंतर कारवाईची ही धडक मोहीम सुरू होणार आहे. महापालिका हद्दीत 35 हजारांपेक्षा जास्त अनधिकृत नळजोड आहेत. मात्र यातून सर्रास पाणीवापर केला जातो. यातील अनेक नळजोडांमध्ये 24 तास पाणीपुरवठा होतो. मात्र या पाण्याचे मूल्य केले जात नसल्याने महापालिकेला पर्यायाने तोटा सहन करावा लागतो. त्यातून ज्यांच्याकडे अधिकृत नळजोड आहेत, त्यांच्याकडे शेकडो कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. त्यांच्याबाबतही कडक धोरण आजपर्यंत घेतले गेले नाही. थकबाकीदारांविरुद्ध कडक धोरण अवलंबणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारीच जाहीर केले आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीची आकडेवारी कमी होऊन महापालिकेच्या तिजोरीत भर पडणार का? हाच प्रश्‍न आहे.

महापालिकेने समान पाणी नियोजनाच्या नावाखाली पाटबंधारे खात्याने केलेली पाण्याची कपात एकप्रकारे मान्य केली आहे. त्यामुळे सोमवारपासून एकवेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र कालवा समितीतील निर्णयानुसार 1,150 एमएलडीच पाणी महापालिकेला दिले गेले, तर एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याशिवाय महापालिकेला पर्याय राहणार नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. पाणीपट्टीची थकबाकी, वापरले जाणारे पाणी आणि कोणताही मोबदला न देता अक्षरश: फुकट पाणी वापरणार्‍यांवर महापालिकेला कडक कारवाई करावीच लागणार आहे. तरच महापालिकेने ठरवलेले पाण्याचे नियोजन काहीअंशी यशस्वी होऊ शकणार आहे.

समान पाणीपुरवठ्याचे नियोजन झाल्यानंतर दिवाळीनंतर अनधिकृत नळजोडांवर कारवाई केली जाणार आहे. ती कारवाई केली तरच समान पाणीपुरवठा करणे अधिक सोपे जाणार आहे; तसेच उपलब्ध पाणी साठ्यांतून शहरातील सर्व भागांना पाणी पुरवणे शक्य होणार आहे. प्रवीण गेडाम, अभियंता, पाणीपुरवठा विभाग