उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांचा इशारा
फैजपूर- फैजपूर उपविभागातील रावेर व यावल तालुक्यातील मोठे, मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षित असून अनधिकृत पाणी उपसा करणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोल यांनी दिला आहे.
अनधिकृत साधने काढावीत अन्यथा गुन्हा
रावेरसह यावल तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान हे अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने पुढील काळात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी फैजपुर महसूल उपविभागातील रावेर व यावल येथील मोठे, मध्य मव लघू प्रकल्पातील पाणीसाठे हे पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षीत करण्यात आलेले आहेत. पाणीसाठे असणार्या ठिकाणी अनधिकृत पाणी उपसा करण्यासाठी सध्या ज्या इसमांनी इलेक्ट्रीक पंप डिझेलपंप अथवा इतर पाणी उपसा करणारी साधने ठेवून कार्यान्वीत केलेली आहेत व अनधिकृत पाणीउपसा करण्याचे काम सुरू आहे त्यांनी तातडीने इलेक्ट्रीक पंप, डिझेल पंप अथवा इतर पाणी उपसा करणारी साधने 15 ऑक्टोबरपर्यंत काढावीत अन्यथा कारवाईप्रसंगी ही साधने आढळल्यास ती जप्त केली जातील तसेच दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.