अनधिकृत बांधकाम न थांबवल्याने सहायक आयुक्त निलंबित

0

नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची घोषणा

मुंबई :- पायधुनी इस्माईल कर्टे रोडवरील नऊ मजली इमारतीतील अनधिकृत बांधकाम न थांबवता कर्तव्यात कसूर करणाऱ्या सी वार्डचे वार्ड अधिकारी तथा सहायक आयुक्तांसह बीट ऑफीसर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधान सभेत केली. या संदर्भात हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश तालिका विधानसभा अध्यक्षांनीही दिले होते.

पायधुनी येथे बेकायदेशिर रित्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे संदर्भात सदस्य शरद सोनावणे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले, याप्रकरणी अनधिकृत बांधकाम करणाऱ्याविरूध्द मुंबई महापालिका अधिनियम व एमआरडीपी कायद्यांर्तंगत कारवाई करण्याची सूचना म्हाडा कार्यालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेस केली होती. अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत अधिनियमाच्या कलम ३५४अ नुसार नोटीस बजाविण्यात आल्या होत्या.

यातील सर्वच अधिकाऱ्यांना निलंबित करा- सुनिल प्रभू
यावर शिवसेनेचे मुख्यप्रतोद सुनिल प्रभू म्हणाले अनाधिकृत बांधकाम करतांना महानगरपालिकेचे वॉर्ड अधिकारी, बीट अधिकारी, कनिष्ठ अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. याच्यासमोर हे बांधकाम होत असतांना या अधिकाऱ्यांनी यांनी हे बांधकाम न थांबविता त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यात सहभागी असलेल्या सर्वच अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी जोरदार मागणी प्रभू यांनी केली.

मात्र या नोटीसानुसार अनधिकृत बांधकाम न थांबविता सी वार्डातील सहायक आयुक्त (वार्ड अधिकारी), बीट अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर व कारवाईत विलंब केल्याने त्यांचे निलंबन केले जाईल. असे डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य जयंत पाटील, अजित पवार, राज पुरोहीत, योगेश सागर, आशिष शेलार, अतुल भातखळकर, पराग अळवणी यांनी चर्चेत सहभाग घेतला.