भुसावळ- दीपनगर प्रकल्पातील गॅस गोदामानजीकच कचरा आणि गवताला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडल्याने यंत्रणेची पळापळ झाली. दीपनगरातील तीन अग्निशमन बंबांच्या सहाय्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता आले अन्यथा आगीजवळ एक हजार गॅस सिलेंडरचे गोदाम असल्याने मोठी अप्रिय घटना घडण्याची शक्यता होती. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कर्मचारी वसाहतीच्या परिसरात असलेल्या गॅस गोदामाच्या परिसरात वाढलेले गवत व कचर्याला सोमवारी दुपारी अचानक आग लागली मात्र सुदैवाने तत्काळ अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे मात्र दीपनगर केंद्रातील कर्मचारी व वसाहतीमधील रहिवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.