अनाथ वैशाली आज होणार दीपकशी विवाहबध्द

0

जळगाव । वैशालीच्या वडीलांचे लहानपणीच निधन झाले. आई मनोरुग्ण होऊन बेपत्ता झाली. नातेवाईकांनी देखील सांभाळण्याची जबाबदारी नाकारल्यानंतर शेवटी जळगावच्या बालगृहात पालनपोषण होऊन लहानाची मोठी झालेली उपवर अनाथ मुलीचा आज गुरुवारी 4 रोजी दीपक नावाच्या मुलाशी लग्न होत आहे. गुरुवारी सकाळी हळद दुपारी 12.35 वाजता लग्न लागणार आहे. वैशाली दीपकचा 2 रोजी बालगृहात साखरपुडा पार पडला. अमळनेर तालुक्यातील वैशाली दहिवदकर या मुलीच्या वडिलांचे 10 वर्षांपूर्वीच निधन झाले. या संकटामुळे आई मनोरुग्ण होऊन बेपत्ता झाली. या विपन्नावस्थेत तिला अनाथ म्हणून बालकल्याण समितीने जळगावच्या बालगृहात दाखल केले. तिने अधीक्षकांना पत्र लिहून दुसर्‍या संस्थेत न जाता विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या इच्छेनुसार कार्यकारी समितीनेवर संशोधन सुरू केले. तीन-चार स्थळे बघितली.

मुलाकडील परिस्थिती पाहून लग्नास होकार
यापैकी यावल तालुक्यातील चितोडा येथील दीपक पाटील या युवकाचे स्थळ तिला पसंत पडले. दीपकचे नाशिक येथे रसवंती चहाचे दुकान आहे. तो मूळचा चितोडा येथील आहे. कार्यकारी समितीच्या सदस्यांनी मुलाच्या घरी कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन खात्री केली. त्याची सामाजिक पाहणी करून विवाहासाठी होकार दिला. एवढेच नव्हे तर दीपकने वैशालीचा लहान भाऊ सौरभचे शिक्षण तसेच सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सौरभ तळई येथील बालगृहात आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळी 6.30 वाजता मेंदी संगीत रजनीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रमेश काटकर उपस्थित राहणार आहे. यापूर्वीही बालगृहातील पाच मुलींचे विवाह कार्यकारी समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन लावून दिले. लग्न झालेल्या मुली पतीसह या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. या वेळी त्यांची ओटी भरण्यात येणार आहे. वैशालीला दोन ग्रॅमचे मंगळसूत्र, नेकलेस संसारोपयोगी वस्तू दात्यांनी दिले आहे.