अनिकेत शिंदे खून प्रकरणी तिघांना अटक

0

मुख्य सूत्रधारासह पाचजण अद्याप फरार

चाकण । अनिकेत संदीप शिंदे या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणी चाकण येथील तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून मुख्य सूत्रधारासह पाच जण फरार झाले आहेत. पूर्व वैमनस्यातून संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात 15 फेब्रुवारीला एका 16 वर्षाच्या शाळकरी मुलावर लोखंडी कोयत्याने वार करून व डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी चाकण येथील आठ तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण फकिरा धनवटे (वय 23), तेजस दीपक रेपाळे (वय 19) व परेश उर्फ प्रवीण ईश्‍वर गुंडानी (वय 26) यांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य सूत्रधार ओंकार मच्छिंद्र झगडे याच्यासह पप्पू धनवटे, नितीन पंचरास, वृषभ देशमुख व महिंद्र ससाणे हे पाचजण फरार झाले आहेत.

जखमीवर उपचार सुरू
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला ओंकार मनोज बिसनाळे (वय 17) याने चाकण पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे. त्याच्यावर येथील जयहिंद हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, सहाय्यक फौजदार दत्ता जाधव, पोलिस नाईक सतीश जाधव, अनिल गोरड, हवालदार नवनाथ खेडकर व होमगार्ड सातकर यांच्या पथकाने शेलपिंपळगाव परिसरात लपून बसलेल्या तीन आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. या गुन्ह्यातील आरोपी ओंकार झगडे व किरण धनवटे यांच्यासह नऊ जणांवर 29 मे 2015 रोजी रिव्हॉल्वर, तलवार, जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून मंडोरा ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना विशाल रेसिडेन्सीमधून हत्यारांसह त्यांना अटक झाली होती.