अनियमित पाणीपुरवठ्याविरुद्ध भुसावळातील शिशिर जावळे यांचा आमरण उपोषणाचा इशारा

भुसावळ : शहरातील प्रभाग 22 मधील शहरातील कस्तुरी नगरातील सर्वे नंबर 131/2 तसेच देना नगर व इतर परीसरात नियमित सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने वेळोवेळी मुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री, नगर विकास सचिव, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर मुख्याध्याधिर्‍यांनी बुस्टर पंप लावून देण्याचे आश्वासन दिले व लाखो रुपये खर्चून पंपही बसवण्यात आला मात्र यंत्रणा यशस्वी झाली नाही. त्यानंतर प्रशासनाने या प्रश्‍नी दुर्लक्ष केल्याने मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री व जळगाव जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे.

ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी हाल
भुसावळ नगरपरीषदेने पिपण्याच्या पाण्याची कुठलेही ठोस उपाययोजना,व्यवस्था केली नसल्याने भर उन्हात्यात नागरीकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी व्हीजीट का करीत नाही वा बोगस नळ कनेक्शन धारकांवर कारवाई का नाही? असा प्रश्‍न जावळे यांनी उपस्थित केला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांना वंचित ठेवणार्‍या मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्यासह पाणीपुरवठा अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी जावळे यांनी केली आहे. तसे न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.