ग्राहकांना सहन करावा लागतोय मानसिक त्रास
संबंधीत ठेकेदारावर कारवाईची मागणी
देहुरोड : देहूगाव तसेच परिसरात महावितरणची वीज बिलांची अनियमीत वाटप होत असल्याने वीज बिलाची थकबाकी भरताना वीज ग्राहकांना दंडाचा भूर्दंड भरावा लागत आहे. त्यामुळे थकबाकीची मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ही थकबाकी कमी करण्यासाठी ग्राहकांना महावितरण कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. अशी तक्रार माजी सरपंच मधुकर कंद यांनी केली आहे. वीज ग्राहकांच्या होणार्या या नुकसानीला जबाबदार असलेल्या संबधीत ठेकेदारावर त्वरीत कारवाई करून वीजबील वितरण व्यवस्था सुधारावी, अशी मागणीही कंद यांनी केली आहे.
वीजबील न भरल्याने पुरवठा खंडित…
वीजबिलाचे वाटप करण्यासाठी महावितरणने खासगी ठेकेदाराची नेमणूक केलेली आहे. मात्र या ठेकेदाराकडून गेल्या काही महिन्यांपासून वीजबिलाचे वितरण देहूगाव परिसरात मुदतीत केले जात नसल्याने निदर्शनास येत आहे. संबधित ठेकेदारांकडून ही बिले एकाच ठिकाणी टाकून दिली जाते. तर घरोघरी वाटप होत नसल्याने संबधित ग्राहकांना ही बिले वेळेत मिळत नाही. याचा परिणाम म्हणून संबधित ग्राहकांना वेळेत बील भरले नाही, म्हणून वीज जोड खंडित केला जातो किंवा बील थकल्याने आगामी बिलात दंडाचा भूर्दंड पडत आहे.
वीज कार्यालयास ग्राहकांचे हेलपाटे…
ग्राहकांचे वीजबिल वेळेत भरले गेले नसल्याने संबधित ग्राहकांकडून ते उशीरा भरले जाते. हे बील भरल्यानंतर ही बिल पुढील महिन्याच्या बिलात लागून येत आहे. हे बील कमी करण्यासाठी निगडी प्राधिकरण येथील कार्यालयात ग्राहकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. नोकरदार ग्राहकांना कामावरील रजा घ्यावी लागते. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागतो. मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे माजी सरपंच कंद यांनी सांगितले. महावितरणने संबधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी आणि वीज बिलाची रक्कमेवरील दंड व होणारे आर्थिक नुकसान संबधिताकडून वसूल करण्याची तसेच बिलांची दुरूस्ती, भरणा करण्यासाठी स्थानिक कार्यालयात सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी कंद यांनी केली आहे.