नवी दिल्ली । राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गैरहजर राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात निरनिराळ्या चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र, माझ्या या अनुपस्थितीचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. मी एप्रिल महिन्यातच सोनिया गांधी यांना भेटलो होतो. बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यावर आम्ही त्यावेळीच एकमेकांशी बोललो होतो. यावेळी त्यांनी केवळ सर्व राजकीय पक्षांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले होते. या बैठकीला आमच्या पक्षाकडून (जदयू) शरद यादव व के. सी. त्यागी उपस्थित होते. त्यामुळे माझ्या गैरहजरीचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे नितीश यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. एकीकडे विरोधकांच्या बैठकीला दांडी मारणारे नितीशकुमार शनिवारी मालदीवचे पंतप्रधान प्रवींद जुगनौथ यांच्या स्वागतसमारंभाच्या मेजवानीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सहभागी होणार आहेत. नितीशकुमारांच्या या निवडीने भाजपबरोबरील त्यांच्या कथित जवळीकीबद्दल चर्चा सुरू झाली होती.
तत्पूर्वी काल सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या बैठकीला 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीत राष्ट्रपतिपदासंदर्भात काही ठोस चर्चा झाली नाही. या बैठकीस काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव, बसपाच्या मायावती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येच्युरी, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, द्रमुकच्या कनिमोळी यांच्यासह सतरा पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, त्याचवेळी बिजू जनता दल, अण्णाद्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस आदी विरोधी पक्षांनी बैठकीकडे पाठ फिरविली. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादवसुद्धा बैठकीकडे फिरकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थित रामगोपाल यादव यांनी पक्षाचे प्रतिनिधित्व केले. आम आदमी पक्षाला निमंत्रणच देण्यात आले नव्हते.