जळगाव : भविष्यात कधी आपल्या मुलाला चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळतात की नाही याची भ्रांत असलेल्या पालकांनी आपल्या मुलांचे अस्खलित मराठी व इंग्रजी भाषेतील सादरीकरण पाहून आज गहिवले नसेल तर नवल! गरीबा घरच्या कोणताही गुणवंत बालक शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने भवरलाल जैन यांनी स्थापन केलेल्या अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी सरत्या वर्षाला आज स्थापना दिवसाच्या रुपात साजरे करत निरोप दिला. तसेच विद्यार्थ्यांनी आपले कलाविष्कार सादर करून रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमात यांची होती उपस्थिती
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलचा स्थापना दिवस बालगंधर्व खुले नाट्यगृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव महानगरपालिकेचे महापौर नितीन लढ्ढा, आयुक्त जीवन सोनवणे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन,
दलूभाऊ जैन, कांतीभाऊ जैन, निशा जैन, इतिहासकार श्रीनिवास साठे, गफ्फार मलिक, राष्ट्रीय खेळाडू कांचन चौधरी, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या रश्मी लाहोटी उपस्थित होत्या. स्कूलच्या स्थापना दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
नाटीकेतून कार्यगौरव सादर
‘भवरलालजी जीवनदर्शन यात्रा’ या नाटिकेच्या माध्यमातून भवरलाल जैन यांचे बालपण, शिक्षण, वैवाहीक जीवन, व्यवसायवृद्धी, सामाजिक सहभाग, जैन स्पोर्टस अकॅडमी, गांधीतीर्थ, कांताई नेत्रालय तसेच भवरलाल जैन यांना मिळालेले विविध पुरस्कार यावर विद्यार्थ्यांनी प्रकाशझोत टाकला. तसेच जैन हिल्सवर साकारलेला हिरवा स्वर्ग, तेथे वास्तव्यास असेलेले विविध पशु-पक्षी यांच्याशी भवरलालजींचा असलेला दृढ ऋणानुबंध विद्यार्थ्यांनी विषयानुरुप वेशभूषेतून उलगडला. भवरलालजी जैन लिखित ‘ती आणि मी’ या पुस्तकांतील भवरलालजी व कांताबाईंचा ठळक सुसंवाद विद्यार्थ्यांनी अभिनयातून प्रस्तुत केला.
विद्यार्थ्यांचा मंत्रमुग्ध कलाविष्कार
मॅजिक शो, कोण बनेगा शिक्षणपती, कव्वाली, विविध जाहिराती, महाराष्ट्राचा भूमिपुत्र, भाऊंची अनुभूती आमची अनुभूती अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भवरलालजी जैन यांचा जीवनपट उलगडला. पुनमचंदजी ठोले यांनी विद्यार्थ्यांचा मंत्रमुग्ध कलाविष्कार पाहून 11 हजार रूपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले. यशस्वीतेसाठी शिक्षक, सहकारी यांनी परिश्रम घेतले.