सरवडच्या शिक्षकाचा खूनच : पोलिसांनी उलगडला गुन्हा ; दोघांना अटक

अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने केला खून ; आधी केला अपघाताचा बनाव : सोनगीर पोलिसांनी उलगडला गुन्हा

धुळे : अनैतिक संबंधात शिक्षक असलेला पती अडसर ठरत असल्याने त्याचा दोघांनी अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करीत काटा काढला मात्र पोलिसांनी बारकाईने केलेल्या तपासात ही बाब उघड झाल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी शुक्रवारी पत्रकार परीषदेत दिली.सरवड येथील शिक्षक संदीपकुमार विश्वासराव बोरसे (34) यांच्या खून प्रकरणी शरद दयाराम राठोड (36, रा.पाडळदे, ता.धुळे, ह.मु.जय मल्हार कॉलनी, साक्री रोड, धुळे) व राकेश उर्फ दादा मधुकर कुंवर (31, कोळी , सरवड, ता.धुळे) यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा
सोमवार, 26 जुन रोजी सरवड ते लामकानी रस्त्यावर सप्तशृंगी देवीमंदिराच्या समोर रात्री 9 वाजेच्या सुमारास शिक्षक संदीपकुमार बोरसे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला होता. तशी नोंदही सोनगीर पोलिसात करण्यात आली. मात्र मृताच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर तसेच घटनास्थळी मिळालेल्या इनोव्हा कारचा लोगो, बंफरचे तुकडे आणि हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा उघउकीस आणला.

संबंधात अडसर ठरल्याने काढला काटा
मयत शिक्षक संदीपकुमार विश्वासराव बोरसे यांच्या पत्नीशी आरोपी शरद राठोड याचे अनैतिक संबंध होते मात्र या संबंधाची कुणकुण बोरसे यांना लागल्याने ते राठोड यांना नेहमीच शिविगाळ करीत होते व राग मनात ठेवून आरोपींनी बोरसे यांचा काटा काढण्यासाठी त्यांना 26 रोजी पार्टीला जावयाचे असल्याचे सांगून सरवड येथून देवभाने फाट्यावर बोलावले. तेथून हॉटेल सुरूचीजवळील देशी दारू दुकानात दारू पाजली व सरवड गावाजवळ सोडून दिले. मयत घराकडे पायीच निघाले असताना आरोपी राकेश कुंवरने आपल्या ताब्यातील इनोव्हा मयतास मागून धडक देत ठार मारले. पोलिसांच्या तपासात ही बाब निष्पन्न झाली व राठोड यांचा मृत्यू अपघाती नसून प्लॉनींग करून खून करण्यात आल्याचे उघड झाल्याचे अपर पोलीस अधीक्षक बच्छाव म्हणाले.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक नामदेव सहारे, हवालदार सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, अतुल निकम, अजय सोनवणे, राम बोरसे, संजय पाटील आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.