अनैसर्गिक कृत्य करणार्‍या नराधमाला अटक

0

जळगाव । नशिराबाद येथील एका दहा वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काल रात्री घडली. बालकावर अत्याचार करणार्‍या नराधमाला अटक करण्यात आली असून या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, नराधमाला शनिवारी न्यायाधीश के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, नशिराबाद पोलिसांकडून नराधमाची कसून चौकशी करण्यात येत आहे.

नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा
डिगंबर भागवत बोंडे (वय 35, रा.खालची आळी) याने गावातीलच एका दहा वर्षीय मुलाला आपण फिरायला जावू म्हणून सोबत घेतले. रात्री साधारण 9.30 वाजेच्या सुमारास सुनसगाव रोडवरील मराठी शाळेजवळ पोहोचल्यानंतर डिगंबरने बालकास अश्‍लिल चाळे करायला सुरुवात केली. त्याने धमकी देत बालकासोबत अनैसर्गिक कृत्य केले. भेदरलेल्या मुलाने घरी आल्यानंतर आपल्या वडीलांना आपल्यावर बेतलेल्या सर्व प्रसंगाची माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी तात्काळ पोलिस स्टेशन गाठले व या प्रकरणातील डिगंबर बोंडेविरुध्द तक्रार दिली. त्यानुसार डिगंबर विरुध्द भादंवि कलम 377, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 3(अ), 4,5 (एम), 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

नशिराबाद पोलिसांनी तात्काळ आरोपी डिगंबरला अटक केली. यानंतर नशिराबाद पोलिसांनी डिगंबर भागवत बोंडे याला शनिवारी न्यायाधीश के.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात हजर केले. न्या. अग्रवाल यांनी नराधमाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.