नवी दिल्ली । वेगळ्या शैलीनी गोलंदाजी करणार्या गोलंदाजांना खेळवण्या बाबत श्रीलंकेचा संघ स्पेशल टीम राहिली आहे. या संघाने नेहमीच अनआर्थोडॉक्स फिरकी गोलंदाज मैदानात उतरवले आहेत. आता पुन्हा एकदा श्रीलंका क्रिकेट संघामध्ये खळबळ उडवून देणार्या एका नव्या गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. 18 वर्षीय लेग स्पिनर केविन कोथिगोडा असं त्याचं नाव आहे. केविन सध्या मलेशियामध्ये 19 वर्षखालील संघाचा सदस्य. तो सध्या युवा एशिया कप खेळत आहे. या आठवड्यात श्रीलंकाने अफगाणिस्तान विरूद्ध 61 धावांचा महत्वपूर्ण विजय केविनच्या मदतीने मिळवला. केविनच्या गोलंदाजीची शैली दक्षिण आफिक्रेच्या पॉल अॅडम्ससारखीच आहे. माजी गोलंदाज पॉल डाव्या हाताचा चायनामन गोलंदाज होता. केविन मात्र उजव्या हाताने तशीच गोलंदाजी करतो. अफगाणिस्तान विरूद्ध मिळवलेल्या विजयात केविनने एक विकेट घेतली होती. श्रीलंका अ संघातील माजी सलामीवीर धमिका सुदर्शनने रिचमोंड कॉलेजमध्ये केविनला तयार केले आहे.
दरम्यान, 1995 मध्ये इंग्लंड विरूद्ध दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हँसी क्रोनिएने 18 वर्षीय पॉल अॅडम्सला पोर्ट ऑफ एलिझाबेथमधील सामन्यासाठी मैदानात उतरवले होते. या सामन्यात अॅडम्सने आठ विकेट घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याच्या भरोशावरच दक्षिण आफ्रिकेने ती मालिका जिंकली होती. श्रीलंकेला आशा आहे की, केविन कोथिगोडा सुद्धा श्रीलंकेचं प्रतिनिधीत्व करेल आणि देशासाठी सामने जिंकेल.