अन्नदात्यासाठी गोळ्या झेलायलाही तयार

0

मुंबई – मध्यप्रदेश पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली. ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना असून भारतीय जनता पार्टीच्या सरकारची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली टिळक भवन येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारच्या कृतीचा निषेध करून निदर्शने केली. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. भाजपा सरकारच्या काळात सीमेवर जवान मरत आहेत आणि देशात शेतकरी आत्महत्त्या करत आहेत. महाराष्ट्रात साडेनऊ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात संप पुकारला आहे. त्याला प्रतिसाद देत मध्य प्रदेशातल्या शेतकऱ्यांनीही संप पुकारला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनातील काही लोकांना हाताशी धरून शेतकऱ्यांचा संप फोडण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी मध्य प्रदेशातल्या भाजपा सरकारने गोळीबार केला, असे ते म्हणाले.

सरकारने गोळ्या घालून ठार केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांना अटक करून भाजपा सरकारने आपला हुकुमशाही चेहरा दाखवला आहे. राहुल गांधी यांनी शेतकरीविरोधी सरकारविरोधात सुरू केलेला लढा प्रदेश काँग्रेस नेटाने पुढे नेईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही अटकच नाही तर गोळ्या झेलायलाही तयार आहोत, असे चव्हाण म्हणाले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम तसेच इतर प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.