अन्नधान्यातील भेसळीमुळे शहरवासियांनी आपले अन्न आपणच पिकवावे

0

पुणे । शेतमालावर फवारली जाणारी कीटकनाशके आणि अन्नधान्यातील भेसळ यामुळे एकूणच मानवी आरोग्य धोक्यात आलेले आहे. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी शहरवासियांनी आपले अन्न आपणच पिकवण्याच्या दिशेने सुरुवात करण्याचा निर्धार केला आहे. ‘शहर शेती कचरा-सांडपाणी घरच्या घरी जिरवू या, सुरक्षित-विषमुक्त अन्न पिकवू या’ या विषयावरील वनराई विशेषांक प्रकाशन समारंभ नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमात तज्ज्ञांनी जमलेल्या सर्वांना शहर शेतीचे धडे दिले.

शहरामंध्ये आज कचर्‍याच्या प्रश्‍नाने उग्र रूप धारण केले आहे. सांडपाण्याच्या समस्येनेसुद्धा चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे. प्रदूषित पाणी पशू-पक्षी आणि माणसाच्या आरोग्यासाठी घातक झाले आहे. त्यामुळे कमीत कमी कचरा निर्माण करून अधिकाधिक कचरा घरच्या घरी जिरविण्याची गरज सध्या भासत आहे. इमारतीच्या छतावर, बाल्कनीत आणि सभोवतालच्या परिसरात भाजीपाला-अन्नधान्य आणि वनस्पतीची लागवड केल्यास त्याठिकाणी ओल्या कचर्‍यासह अनेक टाकाऊ वस्तू उपयोगात आणता येऊ शकतात. अशा अनेक गोष्टीचे मार्गदर्शन मान्यवर तज्ज्ञांनी केले.

श्रमसंस्कार व निसर्गस्नेही जीवनशैलीचे धडे
रवींद्र धारिया म्हणाले, शहरातील शेतीकाम हे ताणतणाव घालवणारे आणि उत्साह वाढविणारे आहे. त्याचबरोबर माती-पाण्यासोबत, कृषी परिसंस्था आणि आपल्या संस्कृतीसोबत पुन्हा आपली नाळ जोडणारे आहे. शहर शेती हे श्रमसंस्कार, स्वावलंबन आणि निसर्गस्नेही जीवनशैलीचे धडे देणारे आहे. सुरक्षित विषमुक्त अन्न आणि निरोगी जीवन प्रदान करणारे आहे. शेतकर्‍याचे कष्ट, चिकाटी आणि संयम याबद्दल जाणीव करून देणारे आणि एकूणच शेतीच्या कामाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आहे. शहर शेती या अंकाच्या माध्यमातून शहरवासीयांमध्ये शहर शेती विषयी जागरुकता करण्याचा प्रयत्न असल्याचे धारिया म्हणाले.

विषमुक्त-नैसर्गिक धान्य महोत्सव
अन्नदाता, वसुंधरा स्वच्छता अभियान आणि वनराईच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पाणी पंचायतच्या संस्थापिका कल्पना साळुंखे व वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. बाणेरमधील संत तुकाराम गड येथे विषमुक्त-नैसर्गिक धान्य महोत्सवादरम्यान हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अन्नदाता चळवळीचे श्रीनिवास खेर, आशुतोष प्रधान, भूषण पाटील आणि सदानंद पेंडसे उपस्थित होते.