पुणेः शरीराची स्थूलता आपल्याला माहित आहे. त्यावर डायट हा उपाय आहे. पूर्वी शतकानुशतके अन्नपदार्थांची कमतरता होती. आता मात्र अन्न भरपूर आहे. सहज उपलब्धता, हाताशी पैसा आणि कमी कष्टात मिळणार्या अन्नाच्या मुबलकतेमुळे, सहाजिकच त्याचे जास्त सेवन केले जाते.परिणामी स्थूलता वाढते. ओबेसिटी हा रोग नाही पण त्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते.असे मत आशा उमराणी मांडले.
बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात नाविन्यपूर्ण आणि पालकांना उपयुक्त अशा विषयांवर कार्यक्रम आयोजित केले जातात. आशा उमराणी यांनी माहितीची स्थूलता या विषयावर मार्गदर्शन केले. जयकर ग्रंथालयात ग्रंथपाल राहिलेल्या आशाताईंचा पहिल्यापासूनच माहितीच्या खजिन्याशी संबंध आला आहे.
भासमय दुनियेत आमुल्य वेळ वाया
प्रथम रेडीओ नंतर टी.व्ही. आणि आता तर 24 तास रतीब घालणार्या शेकडो वाहिन्या त्याद्वारे माहितीचा सतत मारा आपल्यावर होत असतो. त्याच्याबरोबर आपण वाहवत जातो आणि त्यानुसार आचरण करतो.हे फार भयंकर आहे. मुले तर या भासमय दुनियेत आपला अमूल्य वेळ घालवतात, भरकटत जातात. यामुळे भविष्यात ती अनेक शारीरिक व मानसिक रोगांची शिकार होण्याचा धोका आहे. असा इशारा उमराणी यांनी पालकांना दिला.
मुलांना खेळाची गोडी लावा
यावेळी उमराणी म्हणाल्या, मानवी मेंदू एकावेळी एकच गोष्ट प्रोसेस करू शकतो. त्यावर अनेक गोष्टी आढळल्या तर मेंदूचे भिरभिरं होतं. ह्यावर उपाय म्हणजे ‘माहितीचं डायट’. त्याद्वारे स्वतःवर बंधने घालणं महत्वाचं असल्याचं त्या म्हणाल्या. जगण्याला अन्नाप्रमाणे माहितीचीही गरज आहे. ती प्रचंड उपलब्धही आहे. पण त्याच्या आहारी न जाता मुलांना मैदानी खेळांची गोडी लावा, त्यांना ग्रंथवाचनाकडे वळवा. ‘इन्फर्मेशन डायटीशियन’ हे नवीन करिअर तुमच्या मुलांसाठी उपलब्ध राहील.