2016 हे वर्ष मराठा समाजाच्या वेदनेवर फुंकर घालून समाजाला शेवटचा घटक जागृत करणारे वर्ष ठरले. त्या मागे गेल्या अनेक वर्षांपासून असंख्य समस्यांच्या विळख्यात अनेक तोंड देत हा समाज संघर्ष करतो आहे. नापीक शेती, शैक्षणिक सवलती नाही, नोकरीत आरक्षण नाही. बडेजावाच्या नादात लागुन आलेला कर्जबाजारीपणा असो अन् प्रचंड बेरोजगारी यासह अनेक दुर्दैवी अन् मानवतेला कलंक लावणार्या घटनेने हा समाज आडवा उभा हादरला. मराठा म्हणजे वाघ! मराठा म्हणजे सिंह ह्या सगळ्या बिरुदावल्या गळून पडल्या. मराठ्यांना संघटनेची गरजच काय? हा अहंकारही संपून गेला. गेल्या 50 वर्षांच्या कार्यकाळात राजकारण मराठ्यांचा राजकीय वापरच झाला. काही मराठा राजकारणात घराणी पुढे आली. त्यांच्या शह-काटशहाच्या राजकारणात हलके मराठे-भारी मराठे अशी दुही निर्माण झाली. सर्वसामान्य मराठ्यांचे प्रश्न वाढतच गेले. यामध्ये अत्यंत होतकरु हुशार अशा ग्रामीण भागातील युवकांना उच्च शिक्षण घेण परवडत नसल्यामुळे युवकांच्या अनेक पिढ्या गारद झाल्या व त्याचे रुपांतर सर्वात स्वस्त मजुरात झाले.
मराठ्यांचीही संघटना असावी या हेतूने माथाडी कामगार नेते कै. अण्णासाहेब पाटील यांनी ‘मराठा महासंघ’ ही संघटना सुरु केली. पाहता-पाहता राज्यभर व राज्याबाहेरही ‘मराठा महासंघा’ने जोर धरला. मोठ्या ताकदीने संघटना उभी राहिली. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत नविन सामाजिक नेतृत्व पुढे आले. राज्यभर उत्स्फुर्तपणे लाखोंचे मेळावे झाले. समाजाचे प्रश्न घेवून आंदोलने सुरु झाली आणि अण्णासाहेबांच्या अकाली जाण्याने प्रथमच उभ्या राहिलेल्या संघटनेत नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली. त्यानंतरच्या नेतृत्वाने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी संघटना राजकीय दावणीला बांधली स्वतःचे सुभे तयार केले. कधीकाळी ऑफिस बॉय असलेल्या व्यक्तीने आमदारकी मिळविण्याच्या नादात संघटनेत तुकडे पाडले. परिणामी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. अत्यंत ताकदीने उभी संघटना खिळखिळी झाली ही मराठा समाजासाठी दुर्दैवी घटना म्हटली पाहीजे.
या दरम्यान नव्वदीच्या काळात काही शासकीय सेवेतील अधिकार्यांनी एकत्र येवून ‘मराठा सेवा संघ’ ही सामाजिक संघटना उभी केली. मराठा समाजातील शासकीय सेवेच्या माध्यमातून सेवा देत सामाजिक जागृती विविध उपक्रम, सामुहिक विवाह, केडरबेस कार्यकर्त्यांची फौज उभी करण्यास या संघटनेला काही प्रमाणात यश आले. अनेक अधिकार्यांनी समाजातल्या गरीब मुलांना दत्तक घेवून डॉक्टर इंजिनिअर केले. या संघटनेने संभाजी ब्रिगेड ही युवकांसाठी तरी जिजाऊ ब्रिगेड ही युवती व महिलांसाठी संघटना उभी केली. समाजातील युवक-युवती अधिकारी व्हावेत, उद्योजक व्हावेत यासाठी प्रयत्न करीत असतांना संभाजी ब्रिगेडने आक्रमक भुमिकाही घेतली पण नंतर ‘शिवधर्म’ ही संकल्पना राबवून सर्व मराठ्यांना ‘शिवधर्माचा’ स्विकार करण्यासाठी मराठा सेवा संघाने व संभाजी ब्रिगेडसह जिजाऊ ब्रिगेडने आक्रमक काम सुरु केले. भाकरीचा रोजगार महत्वाचा की धर्म महत्वाचा याचा विचार न करता आपली पाळेमुळे समाजात रुजली की नाही याचा विचार केला नाही. मराठा समाज ‘शिवधर्म’ कितपत स्विकारेल या बाबत कोणताही अभ्यास न करता ङ्गशिवधर्मफ चे काम सुरु झाल्यामुळे अनेक कार्यकर्ते संघटनेपासून दूर गेले. वास्तविक बेरोजगारी, तसेच शैक्षणिक अडचणीसारखे भवितव्य घडविणारे विषय बाजुला सारुन धर्माचा झेंडा संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाने खांद्यावर घेतला. त्यानंतर ‘शिवराज्य पक्ष’ व संभाजी ब्रिगेड पक्षाची स्थापना करुन या संघटनांनी स्वतःची अधोगतीच केली. त्यामुळे हजारोेंच्या संख्येने जमा होणार्या कार्यकर्त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत आली. हे सर्व करतांना सामाजिक प्रबोधनाच्या नावाखाली अनेक वाचाळविरांनी सामाजिक प्रश्न शैक्षणिक प्रश्न, शेतीचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, सोडविण्याऐवजी व त्यावर प्रबोधन करण्याऐवजी इतरांची उणी-दुणी काढणे यावरच भर दिला. या संघटनांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या कर्तुत्वाचा इतिहास जागतिक स्तरावर नेला तसेच सिंदखेड राजा हे गाव जागतिक नकाशावर आणले ही मराठा सेवा संघाने महाराष्ट्राला दिलेली मोठी देणगीच म्हणावी लागेल. मात्र इतर बाबीमध्ये ही संघटना मराठ्यांचा विश्वास संपादन करु शकली नाही हे सत्य नाकारता येणार नाही. मराठ्यांना बेरोजगार आणि भाकरीचा प्रश्न सतावत असतांना मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडने मात्र ‘शिवधर्मावर’ शक्ती खर्च केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा यासाठी काही वर्षापुर्वी ‘छावा’ संघटनेने आक्रमक भूमिका घेतली राज्यभर झंझावात निर्माण केला. मराठा समाजही मोठ्या प्रमाणात सहभागी झाला. या संघटनेच्या आक्रमक नेत्याचे अकाली निधन झाल्यामुळे नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्यामुळे संघटनेवर मोठा परिणाम झाला. मध्यंतरी आघाडी सरकारमधील एका मागासवर्गीय मुख्यमंत्र्याने एका रात्रीत प्रथम वर्गाच्या मागासवर्गीय अधिकार्यांच्या बढती आरक्षणाचा मार्ग मोकळा करणारा अध्यादेश काढुन हजारो मराठा अधिकार्यांच्या बढतीला पायबंद घातला. दुर्दैवाने या अध्यादेशासाठी एकाही मराठा आमदाराने अथवा नेत्याने विरोध न करता संमतीच दिली. ही मराठा समाजासाठी दुदैर्वी घटना म्हणावी लागले. मात्र या अध्यादेशाच्या विरोधात काही मराठा जागृत अधिकार्यांनी व पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागुन संघर्षकरुन स्थगिती मिळविली.
आजमीतीला मराठा समाजाच्या समस्यांची, वेदनांची आणि प्रश्नांची भली मोठी यादी समाजासमोर ‘आ’ करुन उभी आहे. आणि हतबल समाज सहन करण्यापलिकडे काहीही करु शकत नाही ही वस्तुस्थिती सर्व मराठा संघटनांनी आघाडी शासनासमोर वारंवार ठेवल्यानंतर आघाडी सरकारने सर्व संघटनांच्या मागणीनुसार आरक्षणासंदर्भात राणे समिती स्थापण केली. पण बराच काळ या समितीचे काम थंड बस्त्यात होते. दरम्यान विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याचे पाहून राणे समिती खडबडून जागी झाली व कामाला गती दिली. यातूनच मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले. या आरक्षणामुळे अनकांना पोटदुखी झाली. आरक्षणाला स्थगिती आली. न्यायालयात ‘तारीख पे तारीख’ सुरु झाली. त्यातच युती सरकारचा बोलघेवडेपणा आणि वेळकाढु धोरणाच्या भूमिकेमुळे समाजाच्या असंतोषाला फुंकर मिळाली. त्यातच कोपर्डीची मानवतेला कलंक फासणारी अमानविय घटना घडली. मराठ्यांच्या महाराष्ट्रात मराठा मुलींवर जातीय भावनेतून प्रचंड अन्याय वारंवार होत आहेत त्या विरुध्द जागे झालेच पाहीजे ही भावना सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजमनाला हाक दिली. औरंगाबादच्या जागृत मराठा बांधवांनी सकल मराठा समजाच्या माध्यमातून एकत्रीत येण्याची हाक दिली त्यातच युती सरकारच्या व यापुर्वीच्याही सरकारच्या शेतकरी हिताविरुध्द भुमीकेनेही असंतोष होताच. परिणामी कोणतेही नेतृत्व नसतांना सकल मराठा समाजाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज सहकुंटूंब मराठा क्रांती मोर्चात एकवटला. या मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व समाजाच्या मुलींनी केले. स्वराज्य स्थापनेनंतर जिजाऊ मां साहेब गेल्या, शिवाजी महाराज गेले आणि मराठ्यांचा महाराष्ट्र गिळंकृत करण्यासाठी शहेनशहा औरंगजेब स्वतः महाराष्ट्रात आला. संभाजी राजांना बलिदान द्यावे लागले तेव्हा नेतृत्वाची पोकळी भरुन काढण्याचे काम महाराणी ताराराणींनी करुन औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडले. शेवटी त्याला औरंगाबाद जवळच दफन व्हावे लागले होते. आणि या क्रांती मोर्चाची मुहूर्तमेढ औरंगाबादलाच रोवली गेली ती मराठा मुलींच्या नेतृत्वाखाली हे विशेष !
औरंगाबानंतर परभणी, जळगाव नंतर पाहता-पाहता प्रत्येक जिल्ह्यात क्रांती मोर्चांनी सनसनाटी निर्माण केली. सरकार काही काळ दबावात आले. काही काळ नमती भूमिका घेतली. आरक्षण, अॅट्रॉसिटी, दुष्काळ यासह अनेक प्रश्नांनी समाज पेटून उठला आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी काही चाणक्यांनी बहुजन क्रांती मोर्चाची आखणी केली. मराठा समाज आमचे आरक्षण गिळंकृत करणार, अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाल्यास अन्याय होईल, असा प्रचार करुन ‘मराठे विरुध्द मराठेतर’ असे वातावरण तयार करण्यास हे चाणक्य यशस्वी झाले. त्यामुळे ग्रामीण राजकारणामध्येही गावागावात दुही निर्माण झाली. वास्तविक मराठा समाजाने मूक क्रांती मोर्चाच्या माध्यमातून स्वतंत्र आरक्षण देतांना कुणालाही बाधा येणार नाही तसेच अॅट्रॉसिटीच्या जाचक अटींबाबत भूमिका घेतली होती. पण त्यानंतर झालेल्या निवडणुकींमध्ये काही पक्ष याचा लाभ घेण्यास यशस्वी ठरले. पण काही अंशी मराठा क्रांती मोर्चाची धार कमी झाली हे नाकारता येणार नाही. मधल्या काळामध्ये दुष्काळाच्या खाईत आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकर्यांनी संपाची हाक दिली. सरकारच्या कर्जमाफीच्या नकारात्मक भूमिकेमुळे ग्रामीण भागामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला यामध्ये मराठा व मराठेतर सारे शेतकरी एकत्र झाल्याचे सकारात्मक दृष्य महाराष्ट्रात दिसू लागले शेवटी नाईलाजास्तव का असेना शासनाला कर्जमाफी करावी लागली. यामुळे मराठा क्रांती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चामुळे निर्माण झालेली दुही बर्याच प्रमाणात कमी झाली.
मराठा समाजातील असंतोष क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समोर आला. लाखो मराठा अत्यंत शिस्तीने, शांततेने असलेल्या मुक मोर्चात सहभागी झाले. आपल्यापासून कुणालाही त्रास होणार नाही ही भावना जपण्यात आली. याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली. मराठा समाज खेकडा प्रवृत्तीचा आहे हा समज क्रांती मोर्चांनी पुसुन टाकला. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून लाखो मराठे एकदिलाने एकत्र आहे हे समाजाचे यश सुवर्णाक्षरांनी लिहीले पाहीजे. न्यायालयाच्या माध्यमातून आरक्षणासंदर्भात काय न्याय मिळतो हे येणारा काळच ठरविणार आहे. आज सरकार मराठा समाजाच्या बाबतीत उदासिन असेलही आणि फसवी आश्वासने फार काळ टिकणारही नाहीत. मराठा समाजाच्या प्रश्नांकडे असेच दुर्लक्ष झाल्यास मराठा समाजातील तरुणांमध्ये झालेली जागृती निश्चितच बंड करेल आणि मराठा नक्षलवाद जन्माला आल्यास आश्चर्य वाटायला नको.!
अशोकराव शिंदे
संस्थापक अध्यक्ष- छत्रपती शिवाजी ब्रिगेड
मोबाईल- 9422283233