थकबाकीदारांच्या मिळकतींसमोर सोमवारपासून वाजणार ‘बॅन्ड बाजा’
पुणे : मिळकतकर थकबाकीदारांच्या मिळकतींसमोर सोमवारपासून ‘बॅन्ड बाजा’ वाजणार असून, त्यामध्ये ज्या मिळकतींवर मोबाइल टॉवर उभे आहेत त्या मिळकतकरधारकांचाही समावेश असणार आहे. मोबाइल कंपन्यांकडे सुमारे 666 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तुम्ही टॉवर कंपन्यांकडून ती वसूल करा, अन्यथा ती तुम्हांला भरावी लागेल अशा स्वरूपाची तंबी मिळकतकरधारकांना देण्यात आली आहे.
थकबाकी वसुली मोहीम सोमवारपासून सुरू होत आहे. महापालिका दरवर्षीच अनेक पद्धतीने मिळकतकराची थकबाकी वसूल करते. त्यामध्ये अभय’सारख्या योजनांचाही समावेश होता. तसेच अनेकदा मिळकतींसमोर बॅन्डबाजा’ही वाजवला जात होता. यावर्षीही बॅन्ड वाजवून वसुली करण्याचा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या बॅन्डबरोबर महापालिकेचे अधिकारी तेथे वसुलीसाठी उपस्थित असणार आहेत. यंदा मोबाइल टॉवर ज्या इमारतींवर आहेत, त्या मिळकतदारांकडूनमोबाइल टॉवरवाल्यांच्या थकबाकीची वसुली केली जाणार आहे.
मोबाइल टॉवर कंपन्या ते पैसे देऊ शकत नसतील, तर तुम्हीच त्यांना टॉवर उभारण्याचा करार खंडीत करून काढून टाका असेही या माध्यमातून सुचवण्यात येणार आहे. मोबाइल कंपन्या न्यायालयात गेल्याने यासंबंधातील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे राज्यसरकारकडून याबाबत अभिप्राय मागवण्यात आला होता. त्यामध्ये राज्यसरकारने टॉवर ज्या जागेवर उभे आहेत त्या मिळकतधारकांकडून वसूल करण्यासंबंधीच्या सूचना दिल्याचे, मिळकतकर आकारणी, संकलन प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले. त्याप्रमाणे ही कार्यवाही करण्यात येत असल्याचेकानडे यांनी नमूद केले. आपल्या मिळकतींसमोर बॅन्ड वाजू द्यायचा नसेल, तर थकबाकीदारांनी थकबाकी लवकरात लवकर भरावी, असे आवाहन कानडे यांनी केले आहे.