…अन्यथा साखर कारखाना संचालकांना फिरू देणार नाही

0

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

पुणे : उसाच्या एफआरपीची रक्कम थकीत ठेवून साखर संकुलामध्ये बैठकांमध्ये नुसती आकडेवारी दाखवू नका, तर एफआरपीची रक्कम त्वरित द्या. अन्यथा साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी साखर संकुल येथे सुरू असलेल्या एका बैठकीत अचानक येऊन दिला. एवढेच नाही तर साखर संकुलामध्ये अधिकारी आणि कारखान्यांच्या प्रतिनिधींना कोंडण्याची तंबीही त्यांनी दिल्याने खळबळ उडाली.

साखर संकुल येथील सभागृहात साखर संचालक (अर्थ) ज्ञानदेव मुकणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागातील साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची बैठक सुरू होती. त्यास पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक शशिकांत घोरपडे यांच्यासह अन्य अधिकारी व कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते. थकीत एफआरपीप्रश्‍नाच्या कारवाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अ‍ॅड. योगेश पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील (बारामती), शिवाजी पाटील (माढा), शंभूराजे खलाटे (फलटण) साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यांची भेट झाली नाही. मात्र त्यानंतर या शिष्टमंडळाने सभागृहात बैठक सुरू असतानाच प्रवेश करीत आंदोलनाचा इशारा दिला.

नुसती चर्चा कशाला?

शुगरकेन कंट्रोल अ‍ॅक्ट 1966 नुसार ऊस गाळपास गेल्यानंतर 14 दिवसात एफआरपीची रक्कम देण्याचे बंधन असूनही कारखाने एफआरपीची रक्कम देत नाहीत, असे राजेंद्र ढवाण यांनी सांगितले. एफआरपी थकीत ठेवूनही साखर आयुक्तालयातील प्रशासन नुसतेच चर्चा करीत आहे. एफआरपीचे पैसे थकीत ठेवून तुम्ही कशी काय चर्चा करता, असा प्रश्‍न साखर संचालकांसह कारखान्यांच्या प्रतिनिधींना स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने विचारला. त्यावरून वादंग झाले.

28 जानेवारीला शेतकर्‍यांचा मोर्चा

थकीत एफआरपीची रक्कम शेतकर्‍याना न मिळाल्यास कोणताही इशारा न देता थेट हल्लाबोल आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 28 जानेवारी रोजी येथील साखर संकुलावर सुमारे एक लाख ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. थकीत एफआरपीप्रश्‍नी यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोणीही गृहीत धरू नये. आगामी मोर्चा आक्रमक स्वरूपाचा व निर्णायक राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अ‍ॅड. योगेश पांडे यांनी पत्रकान्वये दिला आहे.