अन् चोरीचा प्रयत्न फसला

0

जळगाव । राष्ट्रीय महामार्गावरील एका गॅस एजन्सीच्या दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास चोराट्यांनी दुकानाच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र याठिकाणी दुकानात एक कर्मचारी झोपला असल्याने चोराट्यांना डाव फसल्याची घटना सोमवारी उघकीस आली आहे. सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अजिंठा चौफुलीजवळील पेट्रोल पंपाजवळी एका गॅस एजन्सी मध्ये अज्ञात चोरटे चोरीच्या उद्देशाने आले होते. यावेळी त्यांच्याजवळ तवेरा गाडी देखिल होती. एक जण गाडीत, दोन जण बाहेर व दोन जणांनी दुकानाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केली. दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी दुकानात प्रवेक करताच दुकानात झोपलेल्या कर्मचार्‍यांने आरडाओरड केली. यामुळे चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही संपूर्ण घटना येथीलच सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.चोरट्यांनी तोंडावर रूमाल बांधलेले होते. अंधार्‍यामुळे सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये चोरट्यांचा चेहरा व्यवस्थीत दिसुन आलेला नाही. सकाळच्या सुमारास कर्मचार्‍याने ही घटना दुकान मालकास सांगीतली. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता यात चोरटे दिसुन येत होते. या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला असल्याचे संबंधीतांकडून सांगण्यात आले. दुकानात नेहमी कर्मचारी रात्रीच्या सुमारास झोपत असल्याने चोरीची घटना टळली. दरम्यान, चोरट्यांनी आता पुन्हा डोकेवर काढले आहे. यामुळे पोलिस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

ट्रॅक्टर मालकांना अटक; जामीन फेटाळले
जळगाव – शहरातील का.ऊ.कोल्हे विद्यालयासमोरून रविवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास दोन ट्रॅक्टर अवैध वाळु वाहतुक करीत असतांना महसूल विभागाच्या पथकाने पकडले होते. याप्रकरणी आज ट्रॅक्टर मालकांना शनिपेठ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. मात्र, दोघांकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला असता तो न्यायाधीश पाटील यांनी फेटाळून लावला आहे. रविवारी सकाळी 4.30 वाजेच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने एमएच.26.व्ही.9195 व एमएच.19.पी.4576 हे दोन ट्रॅक्टरवरील चालक अवैध रित्या विना परवाना वाळु वाहतुक करीत असतांना मिळून आले. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येवून प्रविण गोकुळ सपकाळे व नामदेव दिनकर कोळी या चालकांना अटक करण्यात आली होती. यातच आज सोमवारी ट्रॅक्टर मालक अविनाश सोपान खडके व प्रदिप दगडू सोनवणे यांना शनिपेठ पोलिसांनी अटक केली. त्यानंतर दोघांना न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सोनवणे व खडके यांच्याकडून जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आले. त्यावर कामकाज होवून न्या. पाटील यांनी दोघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहे.

तरूणावर प्राणघातक हल्ला करणार्‍यास अटक
जळगाव -जुन्या भांडणाच्या कारणावरून विठ्ठल पेठ येथे एकाने हर्षल लक्ष्मण कोल्हे या तरूणावर पट्टीने गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी संशयिताला अटक केली असून त्याच्याजवळून हल्ल्यात वापरलेली पट्टी देखील ताब्यात घेतली आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता 15 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दिवाळीत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून नितीन रामदास झोपे याने हर्षल लक्ष्मण कोल्हे या तरूणावर 10 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास धारधार पट्टीने गळ्यावर प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले. यातच हर्षल याच्या गळ्यावर गंभीर ईजा झाल्याने त्याच्यावर अजूनही ओम क्रिटीकल या रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी मयुर रामचंद्र कोल्हे यांच्या फिर्यादीवरून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी नितीन झोपे यांच्याविरूध्द शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलिसांनी नितीन झोपे याचा शोध घेवून अटक केली.