अन् बिग-बींच्या चाहत्यांचा हृदयाचा ठोका चुकला !

0

मुंबई: दर रविवारी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांना ‘जलसा’ या बंगल्याबाहेर भेटत असतात. मात्र या रविवारी प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी चाहत्यांना भेटणे टाळले. काल रविवारी ते चाहत्यांना भेटू शकले नाही. बिग-बी यांनी ही माहिती ट्वीट करून दिली. अमिताभ यांचे हे ट्वीट चाहत्यांपर्यंत पोहोचले आणि अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. चाहत्यांनी अमिताभ यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी प्रार्थना करणे सुरु झाले. मीडियानेही ही बातमी ठळकपणे प्रकाशित केली. एक दिवस चाहत्यांना न भेटल्याची इतकी मोठी बातमी होईल, हे खुद्द अमिताभ यांनाही ठाऊक नव्हते. त्यामुळेच त्यांनाही आश्चर्य वाटले. सोमवारी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी या भावना व्यक्त केल्या.

एका रविवारी ‘जलसा’च्या बाहेर जमलेल्या चाहत्यांना न भेटल्याची इतकी मोठी बातमी होईल, याची मला कल्पना नव्हती. तुम्हा सर्वांना प्रेम, आदर, आभार,’असे ट्वीट त्यांनी केले.
अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून शेकडो चाहते दर रविवारी ‘जलसा’बाहेर ठाण मांडून बसतात.अमिताभ याला ‘संडे दर्शन’म्हणतात. मुंबईत असले की, दर रविवारी चाहत्यांना अभिवादन करायला बिग बी बाहेर येतात. हात हलवून चाहत्यांना अभिवादन करतात, त्यांचे आभार मानतात. गेल्या कित्येक वर्षांपासून हा ‘सिलसिला’सुरू आहे.