अपंगत्वार मात करत गणेशची व्यवसायात भरारी!

0

शहादा (जिजाबराव पाटील)। जिद्द, चिकाटी व मेहनत असली तर मनुष्य आपले जिवन सुखकर व आनंदी बनवू शकतो. याचे ज्वलंत उदाहरण शहादा येथील गणेश छगन अहिरे या युवकाने स्वत:च्या अपंगत्वाला न डगमगता अपंगावर मात करत पारंपरिक व्यवसायात रस दाखवित अत्यंत सक्षमपणे व्यवसाय करत असून समाजात स्वाभिमानाने जगत आहे. गणेश छगन अहिरे याचे आठवीपर्यंतचे शिक्षण घेऊन वडीलोपार्जित व्यवसाय करतो. स्वत: एका हाताने बुट चप्पल शिऊन, सांधुन आपल्या परिवाराचा गाडा ओढत आहे. वडीलांचा बुट चप्पल शिवणे, सांधणे हा पारंपरिक व्यवसाय वडील छगन अहिरे हे शहादा बसस्थानकाबाहेर करीत असतांना गणेशने लहाणपणापासूनच लक्ष केंद्रीत केले.

पारंपारिक व्यवसाय असल्याने गणेशचे वडीलांना मदत
स्वत:ला एक हात नाही म्हणून मनाने न खचता आपल्या कामाचा ठसा उत्तम प्रकारे उमटविला. बसस्थानकाजवळ फुटपाथवर त्याची दुकान असल्याने ग्रामीण भागातून येणारे नागरिक आपली चप्पल, बुट तुटली की, ती चप्पल गणेशकडे शिवून सांधुन बनवण्यासाठी टाकत असतात गणेश एका हाताने चप्पल, बुटचे काम करतो त्याच्याकडे कौतुकाने पहात असतात. गणेशने शहरात व खेड्यापाड्यात कामाचा ठसा उमटवला आहे. गणेशच्या वडीलांचा हा पारंपारिक व्यवसाय असल्याने गणेश लहानपणापासूनच वडीलांना या कामात मदत करत असे .सात महिन्यापुर्वी वडीलांचे निधन झाले. या व्यवसायाची सर्व जबाबदारी गणेशवर आली. तो एका हाताने उत्तम कलाकुशलता दाखवून जो मेहनताना मिळतो. त्यावर संसाराचा रथ पुढे नेत आहे. गणेश हे चार भाऊ आहेत. कुटुंब मोठे असल्याने बुट चप्पल सिवनकामावर कुटुंबाचा खर्च भागत नसल्याने दोन भाऊ दुस-याच्या बुट चप्पल विक्रीच्या दुकानावर रोजंदारीने काम करतात.व आपल्या कुटुंबाच्या खर्चात आर्थिक भर टाकत आहेत.

गणेशची खंत
मी गेल्या 16 वर्षापासून हा व्यवसाय एका हाताने करीत आहे. याची मला कधीच खंत वाटली नाही. मात्र हा व्यवसाय मी फुटपाथ सारख्या उघड्या जागेवर उन, वारा, पाऊस आदी अंगावर घेत फक्त छत्रीच्या आधारावर हा व्यवसाय करीत आहे. शासन विकलांगासाठी वेगवेगळ्या सुविधा पुरवते. मलाही शासनाची आर्थिक मदत झाली तर मी माझ्या व्यवसायात अधिक कुशलता करून माझा संसाराचा कुटूंबाचा रथ पुढे नेण्यास हातभार लागेल. गणेशच्या परीस्थिती बघता त्याला संबंधित विभागाने आर्थिक मदत मिळवून द्यावी अशाही प्रतिक्रिया नागरीकांच्या उमटत आहेत.