पुणे । अपंगत्वावर मात करून आयुष्याची परिक्रमा करण्यासाठी व अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. अल्पबचत भवन येथे अपंग कल्याण आयुक्तालय, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), बालकल्याण संस्था पुणे व अनाथ संस्था, पुणे यांच्यावतीने दिव्यांगासाठी व पुणे जिल्ह्यातील अपंगांच्या विशेष शाळेतील शिक्षक तसेच मतीमंद व बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, यशदाचे सह-प्राध्यापक डॉ. डी. टी. देशमुख, प्रसिद्ध बासरीवादक पंडित केशवजी गिंडे, सुरेश पाटील, वसंत ठकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रत्येक घटकाने सहयोग द्यावा
एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के विकलांगांचे प्रमाण असून अशा विकलांगांना निर्धारपूर्वक उभे करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपला सहयोग देणे आवश्यक आहे. अपंगत्वावर मात करून त्यांचा मानसिक, शारिरीक विकास करण्यासाठी राज्य शासनाबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था, शाळा, कार्येकर्ते यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. विकलांग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व गुणात्मक वाढीसाठी अधिकाधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अंदाजपत्रकीय तरतूदीमध्ये अधिक तरतूद होण्यासाठी आपण निश्चित पाठपुरावा करू, असे बापट यांनी सांगितले.
गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न
राज्यात 700 विकलांगांच्या विशेष शाळा आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अशा प्रोत्साहनपर कार्यशाळांचे आयोजन केले जाते. यापूर्वी सोलापूर, औरंगाबाद, लातूर, मुंबई येथे कार्यशाळा भरविण्यात आल्या आहेत. संगीत, नृत्य, ध्यानधारणा, विविध क्रिडा प्रकारांचा या कार्यशाळेत अंतर्भाव केला असल्याने विकलांग विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता वाढविण्यास याचा मोठा फायदा होत असल्याचे अपंग विकास आयुक्त नितीन पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी साधला मुलांशी संवाद
कार्यशाळेत पहिल्या सत्रात नृत्य, संगीत, ध्यान धारणा यावर आधारीत कार्यक्रम पार पडले. यावेळी पंडित केशवजी गिंडे यांचे बासरीवादन झाले. तर दुसर्या सत्रात योगाभ्यास, निसर्गोपचार, आहारचिकित्सा, हास्योपचार याविषयी विशेष शाळांतील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्त कलाकुसरीच्या वस्तुंच्या प्रदर्शनाची बापट यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.