अपघातात बालंबाल बचावले दुचाकीवरील दोघे भावंड

0

जळगाव – एकीकडे शहरात वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे महामार्गाला समांतर रस्ते व्हावेत, यासाठी समांतर रस्ते कृती समितीचे आठ दिवसांपासून उपोषण सुरु असताना दुसरीकडे महामार्गावर अपघाताच्या घटना आहे, तशाच आहेत. गुरुवारी दुपारी दुचाकीवरुन जाणारे दोन भावडं ट्रकच्या धडकेत बालंबाल बचावले आहेत. यात ट्रकच्या चाकाखाली दुचाकी आल्याने तिचे नुकसान झाले आहे. पंकज रसिकलाल सोनी व जितेंद्र सोनी रा.गणपतीनगर अशी बालंबाल बचावलेल्या दोन्ही भावंडाची नावे आहेत.

पंकज सोनी हे भाऊ जितेंद्र यांच्यासोबत दुचाकीवरुन (एम.एच बी.झेड 3333) शहरातून इच्छादेवी चौफुलीमार्गे अजिंठा चौफुलीकडे जात होते. यादरम्यान महामार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी जाण्यासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबले. यानंतर रस्ता पार करत असतांना त्यांनी येणार्‍या अजिंठा चौफुलीकडून येत असलेल्या ट्रक (क्र. एम.एच12, एच.डी. 5019) ला थांबा म्हणून हाताने इशारा केला तसेच आवाजही दिला. मात्र तरीही ट्रक चालकाने दुरुन गाडी न थांबविता दुचाकीजवळ आल्यावर अचानक ब्रेक दाबले.

वादावादीमुळे घटनास्थळी गर्दी
यात गाडी काढण्यासाठी ट्रक मागे घेत असताना ट्रक पुन्हा मागे उभ्या असलेल्या गॅरेजवरुन काम करुन घराकडे जात असलेल्या आदित्य शिंपी यांच्या कार (क्र एम.एच.19 बी.जे. 5)वर आदळला. कारचेही नुकसान झाल्याने कारचालकानेही ट्रकचालकासोबत वाद घातला. एकीकडे दुचाकीवरील भावंड तर दुसरीकडे कारचालक अशा तिहेरी भांडणामुळे घटनास्थळावर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान याबाबत पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद नव्हती. मात्र दैव बलवत्तर दोघे सोने भावंड बचावले अशीच प्रतिक्रिया उपस्थितांमधून यावेळी उमटली.

गाडीवरुन उडी मारल्याने दोघे बचावले
ट्रकला हात दिल्यावर ट्रक थांबत नसल्याचे लक्षात आल्यावर दोघा भावंडांनी दुचाकी सोडून उडी मारली. यात दुचाकी ट्रकच्या समोरील चाकाखाली असल्याने तिचे नुकसान झाले. मात्र दोघे सोनी भावंड बालंबाल बचावले. दुचाकीचे नुकसान भरपाई देण्यावरुन ट्रकचालक व सोनी भावंडामध्ये वादावादी झाली.