यावल- तालुक्यातील साकळी येथील 24 वर्षीय उसतोड मजूर युवक भगवान भील याचा ऐन दिवाळी दरम्यान वाहनास अपघात होऊन जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी अपघातात मृत्यू झालेल्या भगवानच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
कामावर जाताना अपघात ; गावावर शोककळा
साकळी येथील भिल वाडा परीसरातील रहिवासी भगवान अशोक भील (24) यांचा 4 रोजी रात्री इंडिका वाहनाने ऊसतोड करण्याच्या कामावर जात होता. त्याच्या सोबत वाहनात सोबत दोन आत्या व कामावरील मुकादमही होता. प्रवास करीत असतांना 5 रोजी सकाळी भल्यापहाटे चार वाजेदरम्यान नगर पुणे महामार्गावर आष्टी गावाजवळ अज्ञात अवजड वाहनाने इंडिकाला धडक दिल्याने भगवान भील यांचा मृत्यू झाला. घटनेची वार्ता गावात पसरताच ऐन दिवाळीत गावभर शोककळा पसरली. सदर घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी युवासेना तालुका अध्यक्ष गोटू सोनवणे, युवासेना गटप्रमुख महेंद्र चौधरी यांच्यासह युवासेना कार्यकर्ते हजर होते.