तळोदा । तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे शनिवारी सकाळी 9:30 वाजेचा सुमारास बोलेरो क्रं. एमएच 39 एबी 0052 व मोटारसायकल क्रं. एमएच 39 एक्स 4850 यांची समोरासमोर धडक झाल्याने त्यात मोटारसायकलस्वार आत्माराम चुनिलाल पाडवी (वय 50) याचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेली 20 वर्षीय मुलगी मंदा आत्माराम पाडवी ही जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे हलविण्यात आले आहे.
असा घडला अपघात
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महेंद्रा बोलेरो (क्रं. एमएच 39 एबी 0052) हे तळोद्याहुन धडगावला जात होती. तर तालुक्यातील आंबागव्हान येथील आत्माराम चुनिलाल पाडवी (वय 50) हे मुलगी मंदा आत्माराम पाडवी (वय 20) ही तळोदा येथील दवाखान्यात उपचारासाठी बजाज प्लसर मोटारसायकल (क्रं. एमएच 39 एक्स 4850) ने घेऊन जात असताना सकाळी 9:30 वाजेचा सुमारास तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे बोलेरो व मोटारसायकल बजाज प्लसर यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
30 मीटरपर्रंत फरफटले
धडक खूपच जोरदार होती त्यात बोलेरोने मोटारसायकलला आपल्या सोबत फरफटत नेले. जवळपास 30 मी. फरफटत नेल्यानंतर मोटारसायकल स्वार आत्माराम पाडवी व त्यांची मुलगी मंदा पाडवी रस्त्याचा कडेला असलेल्या खड्ड्यात फेकले गेलेत. त्यात आत्माराम पाडवी यांच्या डोक्याला, कपाळावर, दोन्ही हाताला तसेच पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची मुलगी मंदा पाडवी हिचा पायाला जखम झाली असून तिला पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे हलविण्यात आले आहे.
दंगा पथकाला पाचारण
अपघातात मोटारसायकल स्वार आत्माराम चुनिलाल पाडवी याचे जागेवरच निधन झाले व त्याची मुलगी मंदा हिला गंभीर दुखापत झाली असल्याचे आंबागव्हान येथील ग्रामस्थांना कळल्यावर, जवळपास 200 ग्रामस्थ घटस्थळी जमा झाले. आत्माराम पाडवी हे अपघातात जागीच मरण पावले हे बघून ग्रामस्थ संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून नंदुरबार व अक्कलकुवा येथील दंगा पथकास पाचारण करण्यात आले होते.
दोघांनी घेतला जगाचा निरोप
आज अपघातात जागीच मृत्यू पावलेले आत्माराम पाडवी यांचा पत्नी जयतीबाई आत्माराम पाडवी यांचे 20 एप्रिल रोजी दुःखद निधन झाले होते. अश्याप्रकारे पत्नीने जगाचा निरोप घेतल्यानंतर 10 दिवसाच्या आतच पतीवर देखील काळाने घाला घातला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नशेत गाडी चालवून चुकीच्या दिशेने मार्गक्रमण पडले महागात
घटनास्थळी उपपोलीस निरीक्षक यादव भदाणे, युवराज चव्हाण, रामदास पावरा, तारसिंग वळवी, जगमसिंग वसावे यांनी भेट दिली. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात अशोक सखाराम पाडवी रा. लक्कडकोट ता. तळोदा यांनी फिर्याद दिली असून बोलेरो गाडीचा ड्रायव्हर गुलाब बोगता पावरा रा. हरणखुरी ता. धडगाव हा दारुचा नशेत गाडी चालवीत होता व त्याने रॉग साईडने हलगर्जीपणे गाडी चालविली म्हणून अपघात झाला असे सांगितले आहे. त्यानुसार तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. तारसिंग वळवी हे करीत आहेत.