अपघात टाळण्यासाठी राज्यभर इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम!

0

मुंबई । अपघात टळावेत आणि सुलभ वाहतूक व नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर मुंबईत ऑर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टिमचा वापर करण्यात येणार आहे. त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. परिवहन विभाग व वाहतूक पोलीस विभाग, मुंबई यांच्या वतीने आयोजित रस्ते सुरक्षा पंधरवड्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलाय
राज्यात सुमारे 3 कोटी 28 लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये 36 लाख वाहनांची नोंदणी झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. मुंबई सारख्या शहरात त्यामुळे वाहनतळाची समस्या निर्माण झाली आहे. पुरेशा प्रमाणात वाहनतळे उभारल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे.

वाहतूककोंडी टळावी म्हणून…
ऑर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमामातून लोकांच्या सवयी, घडणारे गुन्हे, वाहतुक यांचा अभ्यास करून त्याचे विश्‍लेषण करून व्यवस्था उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत असलेल्या इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिममुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा अभ्यास करण्यात येऊन त्याप्रमाणे वाहतुकीचे नियोजन करता येणार आहे. यामुळे वाहतूककोंडी टाळणे, अपघात टाळणे शक्य होत आहे. ही यंत्रणा आता लवकरच संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे. इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिममुळे पुण्यातील वाहतूक सुधारण्यास मदत होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गावर वापरणार
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर शून्य अपघातासाठी स्मार्ट इंटेलिजन्स असलेली यंत्रणा तयार करण्यात येणार आहे तसेच पुणे मुंबई महामार्गावरसुद्धा अशी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा पंधरवडा हा फक्त साजरा न करता यातून सुरक्षित प्रवासासाठी लोकप्रबोधन व जागृती करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.