अपना बँक-जनसामान्यांची प्रगतिशील बँक

0

कै.दादासाहेब सरफरे हे संस्थापक अध्यक्ष होते. त्यानंतर उपेंद्र चमणकर, अ‍ॅड. एन. के. सावंत, सहदेव फाटक, विनायक जागुष्टे, जॉर्ज पटेल या दिग्गजांनी अपना बँकेचे अध्यक्षपद भूषविले आहे. दत्ताराम चाळके यांनी 2 ऑगस्ट 2003 पासून अपना बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. या काळात सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणे हे अतिशय आव्हानात्मक काम होते. माधवपुरा बँकेच्या गैरव्यवहारामुळे बँकांबद्दल लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अशा परिस्थितीत काम करत असतानाही बँकेच्या संख्यात्मक वाढीबरोबरच गुणात्मक वाढीला चालना देण्याकडे दत्ताराम चाळके यांचा कटाक्ष होता. एकीकडे नव्या शाखा उघडण्यास रिझर्व्ह बँक परवानगी देत नव्हती. सहकारी बँकांना शेड्युल्ड दर्जा देण्याचे रिझर्व्ह बँकने बंद केले होते. त्यामुळे व्यवसायवृद्धी असूनही शेड्युल्ड बँकांना मिळणार्‍या सवलती अपना बँकेला मिळत नव्हत्या. अशा परिस्थितीत सहकारी संचालकांच्या पाठिंब्यावर, कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेवून बँकेची प्रगती करण्याचा निश्‍चय चाळके यांनी केला. आपल्या प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर व आर्थिक क्षेत्राच्या सखोल अभ्यासाच्या बळावर या सर्व अडचणींवर मात करून त्यांनी बँकेला यश मिळवून दिले. 2008 ते आतापर्यंतच्या एवढ्या कमी कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणावर बँकेची झालेली वाढ निश्‍चितच समाधानकारक आहे.

बँकेच्या स्थापनेनंतर बँकेचा शाखा विस्तार नायगाव, लोअर परेल, वडाळा, परेल असा कामगार भागात मर्यादित होता. कालांतराने ग्राहकांचा विश्‍वास संपादन केल्यानंतर अंधेरी, मालाड, दिंडोशी, चारकोप, बोरिवली असा मुंबईच्या पश्‍चिम उपनगरात शाखा विस्तार झाला. त्याचप्रमाणे परेल, कुर्ला, भांडुप असा पूर्व उपनगरातही शाखा विस्तार झाला. 2002 पर्यंत बँकेच्या 13 शाखा होत्या. त्यानंतर 2007 पर्यंत रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार सहकारी बँकांना शाखा विस्तारासाठी परवानगी मिळत नव्हती. पुढे रिझर्व्ह बँकेचे निकष काही प्रमाणात शिथील झाल्यावर अपना बँकेला नवी मुंबईत वाशी येथे शाखा सुरू करण्याची रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळाली. 30 मार्च 2008 ला अपना बँकेची 14 वी शाखा सुरू झाली. आर्थिक निकष पाळणार्‍या बँकांनाचा मर्यादित स्वरूपात शाखा विस्ताराला परवानगी देण्याचे रिझर्व्ह बँकेचे धोरण असल्यामुळे बँकेला व्यवसाय वाढीसाठी मर्यादा पडत होत्या. त्यामुळे संचालक मंडळाने विलीनीकरणाचा पर्याय निवडून बँकेची वाढ करण्याचे ठरविले. त्यानुसार मालाड येथील आजारी असलेली केअर को-ऑप. बँक दि. 1 जुलै 2008 रोजी विलीन करून घेवून सहकार क्षेत्रात एक धाडसाचे पाऊल टाकले. नॉन शेड्युल्ड बँकेमध्ये एखादी सहकारी बँक विलीन होण्याची ही पहिलीच घटना आहे. याच अनुभवाचा फायदा घेऊन अपना बँकेने 11 एप्रिल 2010 रोजी सांगली जिल्ह्यातील आष्टा अर्बन को-ऑप. बँक तिच्या 9 शाखांसह विलीन करून घेतली व सहकाराच्या पंढरीत आपले पाऊल टाकले. पुढे 1 ऑक्टोबर 2011 रोजी कोल्हापूर येथील 96 वर्षाची जुनी श्री बलभीम सहकारी बँक तिच्या 10 शाखांसह अपना बँकेत विलीन करून घेतली. त्यावेळी या भागात सहकारी बँकांबद्दल काहीसे अविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले होते. या विलीनीकरणामुळे ते दूर होण्यास मदत झाली शिवाय ठेवीदारांनाही दिलासा मिळाला. या विलीनीकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे या बँकांचा तोटा आणि बुडीत कर्जाची जबाबदारी अपना बँकेने घेतली. शिवाय त्याबँकेतील कर्मचार्‍यांनाही अपना बँकेत सामावून घेतले. एक मोठे आव्हान या विलीनीकरणातून स्वीकारले होते. आज सांगताना आनंद वाटतो की, या सर्व शाखा सुस्थितीत असून उत्तम ग्राहक सेवा देत आहेत.

एप्रिल 2013 मध्ये अपना बँकेला मल्टीस्टेट सहकारी बँकेचा दर्जा मिळाला आहे व महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा आणि गुजरात येथे कार्यक्षेत्र विस्तारासाठी रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. त्यानंतरची महत्त्वाची घटना म्हणजे आम्ही अनेक वर्षे अपेक्षा बाळगलेले शेड्युल्ड दर्जा मिळण्याचे स्वप्न ऑक्टोबर 2015 मध्ये पूर्ण झाले. अपना सहकारी बँक मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक झाली. मागील 13 वर्षांत एकाही बँकेला शेड्युल्ड दर्जा देण्यात आला नव्हता त्यामुळे अपना बँकेला मिळालेला हा बहुमान आम्हा सर्वांना अभिमानास्पद आहे.

मार्च 2008 पर्यंत केवळ 13 शाखा असणार्‍या अपना बँकेच्या आता 81 शाखा झाल्या आहेत. एकूण व्यवसायाचा 5 हजार रुपये कोटीचा टप्पा बँकेने पार केला आहे. आणखी 4 शाखा उघडण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे. नजीकच्या काळात बँकेच्या 85 शाखा होतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड, पुणे, नाशिक व कोकणासह गोव्यातील ग्राहकांना अद्ययावत सेवा देत आहे.

बँकेचे स्वमालकीचे स्टेट ऑफ दि आर्ट असे डेटा सेंटर असून त्याद्वारे आधुनिक कोअर बँकिंग सोल्युशनच्या माध्यमातून आरटीजीएस/एनइएफटी, रुपेे डेबीट कार्ड, एसएमएस बँकिंग, मोबाइल बँकिंग आदी सुविधा बँक आपल्या ग्राहकांना देते. डिमांड ड्राफ्ट, फॉरेन एक्सचेंज, एल. सी. डिसकाऊंटींग याही सेवा बँकेमार्फत दिल्या जातात. या व्यतिरिक्त अपना बँक लाइफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स या सुविधा देते. त्यासाठी 6 विविध कंपन्यांची कॉर्पोरेट एजन्सी अपना बँकेकडे आहे. देशभरातील दोन लाखाहून अधिक एटीएम मधून अपना बँक आर्थिक सेवा देते.

बँकेने 2007 मध्ये 1000 कोटी रुपयांचा एकूण व्यवहाराचा टप्पा पार केला. 2011 मध्ये 2000 कोटी, 2013 मध्ये 3000 कोटी, 2015 मध्ये 4000 कोटी तर मार्च 2016 रोजी 5000 कोटी रुपयांचा एकूण व्यवहाराचा टप्पा पार केला. म्हणजेच, 1000 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यास बँकेला 39 वर्षे लागली तर नंतर केवळ नऊ वर्षात बँकेने 5 हजार कोटी रुपयांचा एकूण व्यवसायाचा टप्पा पार केला. यावरून बँकेच्या प्रगतीचा वेग आणि बँकेवरील ग्राहकांचा वाढता विश्‍वास आपणास दिसून येतो.

अपना बँकेने केलेल्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे बँकेला दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन, आयबीएन लोकमत, बँको अ‍ॅवार्ड, एनपीसीआय, बीएफएसआय, बँकिंग फ्रंटिअरर्स एफसीबीए यासारख्या संस्थांकडून उत्कृष्ट सहकारी बँक तसेच उत्कृष्ट तंत्रज्ञानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अलीकडेच दि महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स् फेडरेशनने सर्वोत्कृष्ट सहकारी बँक म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन अपना बँकेचा गौरव केला. आजवर बँकेला 23 विविध पुरस्कार मिळाले आहेत.
सहकाराच्या तत्त्वांचे तंतोतंत पालन करून बँक जनसामान्यांसाठी अनेक सामाजिक उपक्रमास आर्थिक हातभार लावते. केईएम इस्पितळातील वॉर्डमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी सहाय्य, कारगिल युद्धात कामी आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत, मुंबईत उद्भवलेली पूर परस्थिती, गुजराथ मधील भूकंप, महाराष्ट्रातील दुष्काळ अशा विविध नैसर्गिक आपत्तीकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत. तसेच ग्रामीण भागातील दुर्गम शैक्षणिक संस्थांना आर्थिक सहाय्य, त्याचबरोबर सामाजिक संस्थांना आर्थिक मदत अशा अनेक सामाजिक कार्यात अपना बँक नेहमीच अग्रेसर असते. शुश्रुषा या दादर येथील सहकारी तत्त्वावर चालणार्‍या हॉस्पिटल बरोबर अपना बँकेच्या सभासदांच्या वैद्यकीय सुविधेसाठी करार करून अपना बँकेने सहकार क्षेत्रात नवा पायंडा पाडला आहे.

भविष्यात उंच भरारी घेण्यासाठी अपना बँक सज्ज आहे. अत्याधुनिक ग्राहक सेवा देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित सेवा विकसित करून इंटरनेट बँकिंग सुविधा, युनिफाइड पेमेंट इंटरफेस, (युपीआय) सुविधा, युटिलिटी बील पेमेंट अर्थात भारत बील भरो सुविधा, कॅशलेस व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना प्रवृत्त करणे, इ-केवायसी, अंगठ्याच्या ठश्याच्या मदतीने आर्थिक व्यवहार करण्याची टेक्नॉलॉजी आणण्याचा आणि 2020 पर्यंत 10,000 कोटींचा एकूण व्यवसाय करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.

सुवर्ण महोत्सवी वर्षात बँकेने अनेक उपक्रम करण्याचे ठरविले आहे. जसे शाखांवार रोषणाई, सजावट स्पर्धा, सहकाराचा प्रसार करण्यासाठी शाखा परिसरात सहकार दिंडी काढणे, अपना बँकेची 50 वर्षाची वाटचाल सांगणारी स्मरणिका प्रकाशित करणे, महिलांसाठी व ज्येष्ट नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम, तरुण लघुउद्योजकांना मार्गदर्शनपर शिबिर, आंतरबँक एकांकिका स्पर्धा, सांगली, कोल्हापूर, कोकण, ठाणे, पुणे, वाशी, रायगड या झोनमध्ये, ग्राहक व सभासद मेळावे, कॅशलेस व्यवहारासाठी ग्राहक व सभासदांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी शिबिर.

कर्मचार्‍यांच्या विविध स्पर्धा, अपना बँक स्पोटर्स् क्लबतर्फे विविध कार्यक्रम, आपलं अपना या गृहपत्रिकेच्या विविध विषयांवरील 4 अंक प्रकाशित करणे या कार्यक्रमांचे आयोजन करून अपना बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येईल.

– दत्ताराम चाळके
अध्यक्ष – अपना बँक