सोयगाव बालहत्या प्रकरण ; वडिलांचा आसूड उगवण्यासाठी बालकाचे अपहरण करून केली हत्या
जळगाव ः सोयगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या 6 वर्षीय बालकास पाचोरा शिवारातील त्याच्याच शेतात नेऊन गळा आवळून खून करण्यात आला. मृत बालकाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली म्हणून त्याचा आसूड उगवण्यासाठी संशयिताने बालकाचे अपहरण करून खुनानंतर मृतदेह विहिरीत टाकून पळ काढला. या प्रकरणी पाचोरा पोलिसांत दाखल अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने संशयिताविरुद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्या. आर. जे. कटारिया यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
काय होते प्रकरण
सोयगाव येथील शेतकरी व गावाचे सरपंच राजेंद्र श्रावण परदेशी यांच्या शेतातील जलवाहिनी व ठिबकचे जून 2017 मध्ये नुकसान झाले होते. घडलेला प्रकार गावातील मणिराम परदेशी यांनी शेतमालकांना सांगितल्यावरून या प्रकरणी संशयित ऋषिकेश परदेशी (वय 21) याच्याविरुद्ध बनोटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तुझ्या सांगण्यावरून तक्रार दाखल होऊन मला पोलिसांनी मारले, म्हणून ऋषिकेश परदेशीने मणिराम यांच्या शेतातील कपाशी पीक उपटून फेकत नुकसान केले. घडलेल्या प्रकारात पुन्हा त्याच्यावरच संशय घेऊन त्याला विचारणा केली असता याचा राग येऊन ऋषिकेश परदेशीने 24 ऑगस्ट 2017 ला मणिराम परदेशी यांचा सहावर्षीय मुलगा रूपेश याचे अपहरण करून गळा आवळून त्यास ठार केले व नंतर मृतदेह शेतातील विहिरीत टाकून पळ काढला. रूपेशला शेताकडे नेताना ऋषिकेशला ग्रामस्थांनी पाहिले होते. लगेच त्याचा पाठलाग करून शेतातील विहीर उपसून मृतदेह बाहेर काढला होता. पाचोरा पोलिस ठाण्यात या प्रकरणी ऋषिकेश परदेशीच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. खटल्याचे कामकाज जिल्हा न्यायालयात न्या. आर. जे. कटारिया यांच्या न्यायालयात होऊन न्यायालयाने 16 महत्त्वपूर्ण साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून घेतल्या. प्राप्त पुराव्याच्या आधारे संशयितांविरुद्ध दोषारोप सिद्ध होऊन न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
16 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या
दाखल खटल्यात सरकारी अभियोक्ता सुरेंद्र काबरा यांनी मृत बालकाचे वडील मणिराम नथ्थू परदेशी, सरपंच राजेंद्र परदेशी, संगीताबाई पवार, मंगलाबाई गढरी, डॉ. अतुल महाजन आदींच्या महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवून घेतल्या. 16 साक्षीदार, परिस्थितीजन्य पुरावे, प्रत्यक्ष साक्षीदारांची साक्ष आदींच्या आधारावर संशयिताला जास्तीत जास्त शिक्षेची मागणी करण्यात आली. संशयित आरोपी ऋषिकेश परदेशी यास कलम-302 अन्वये जन्मठेप, कलम-201, 363 प्रमाणे प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दंड एक हजार रुपये, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त शिक्षा ठोठावली आहे.