अपहरण करून खून प्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा

0

अमळनेर । पारोळा तालुक्यातील शेवगे तांडा येथील 14 वर्षीय मुलाचे अपहरण करून, खंडणीसाठी त्याचा खून केल्याप्रकरणी गावातील मोतीराम रोहीदास पवार व मोरसिंग सोनू पवार या दोघांना अमळनेर न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी दिला. आरोपी मोतीराम पवार व मोरसिंग पवार यांनी रणछोडदास पवार याच्याकडून उस तोड कामागारांना पैसे देण्यासाठी दोन लाख रूपये घेतले होते. ते त्यांनी खर्च करून टाकले होते.

दोन लाख रूपये खर्च केल्यानंतर त्यांनी अपहरणाचा कट रचून 3 ऑक्टोबर 14 रोजी रणछोडदास पवार यांचा मुलगा अरूण पवार (14) याचे अपहरण केले होते. मुलाने आरडाओरड केल्याने, दोघांनी त्याचा गळा आवळून खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी पदम पवार यांच्या शेतातील नाल्याच्या कपारीत पुरून ठेवले. याप्रकरणी आरोपींना 5 ऑक्टोबर 2014 रोजी अटक करण्यात आली होती. पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. हा खटला अमळनेर न्यायालयात चालला. सरकारी वकील अ‍ॅड. किशोर बागूल यांनी 11 साक्षीदार तपासले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना अपहरण प्रकरणी 10 वर्षे, कट रचल्याप्रकरणी 10 वर्षे, पुरावा नष्ट करण्याकामी 3 वर्षे, व खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.