धुळे- विवाहाला नकार दिल्यामुळे अपहरण करून बळजबरी मंदिरात लग्न लावण्यात आल्याची तक्रार मध्य प्रदेशातील बडवानी येथील 25 वर्षीय शिक्षिकेने दिली आहे. त्यानुसार शिरपूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी बडवानी येथील शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार कुणाल प्रकाशसिंग जमादार याला लग्नाला नकार दिला. त्याचा राग आल्याने कुणालने योगेंद्र देवनाथसिंग राजपूत, नयन महेंद्रसिंग राजपूत, चंद्रकला प्रकाशसिंग जमादार, सिद्धार्थ संतोष राजपूत, किरण प्रभाकर राजपूत यांच्या मदतीने पळवून नेले. त्यानंतर मंदिरात नेऊन बळजबरीने विवाह केला. विरोध केल्यास तुझ्या कुटुंबीयांना त्रास देईल, अशी धमकी दिली. हा प्रकार 10 मार्च 2018 रोजी घडला होता, असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.