अपहरण झालेला मुलगा सापडला

0

नवी मुंबई । वाशी रेल्वे स्टेशन परिसरातून बुधवारी अपहरण झालेल्या तीन वर्षीय मुलाचा शोध लागला असून, पोलिसांनी त्या मुलाला कळवामधून ताब्यात घेत त्याच्या पालकांच्या स्वाधीन त्याला केले आहे. मात्र, त्या मुलाचे अपहरण करणार्‍या आरोपीचा शोध अद्याप लागला नसल्याने वाशी पोलिसांनी त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे. सध्या अनेक ठिकाणी अपहरणाचे प्रकार घडत असल्याने पोलिसांसमोर एक प्रकारचे आव्हान ठाकले आहे. मात्र वाशीमधील हा प्रकार सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे उघडकीस आल्यामुळे सदर अपहरणकर्त्याला दुसर्‍या दिवशीच कळवा रेल्वेस्थानकावर सदर मुलगा आढळून आला. व कुटुंबीयांच्या स्वाधिन करण्यात आला. मात्र अपहरणकर्ता अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

वाशी रेल्वेस्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाली होती माहिती
तीन वर्षीय मुलाचे अपहरण करून नेणार्‍या अपहरणकर्त्याचे सीसीटीव्ही फूटेज मिळूनदेखील त्याचा शोध लागलेला नसल्याने अपहृत मुलाचा शोध घेण्यासाठी नवी मुंबईतील सर्व झोपडपट्ट्या पिंजून काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली. सदर शोधमोहीम सुरु असतांना शनिवारी रात्री काही महिलांना अपहरण झालेला रघू नाना शिंदे (3) हा कळवा रेल्वे स्टेशनवर दिसून आला. त्या महिलांनी त्याला रात्रभर आपल्या घरी ठेवत सकाळी कळवा पोलीस ठाणे गाठले.आणि सदर प्रकार सांगितला. यावर कळवा पोलिसांनी या प्रकरणाची माहिती वाशी पोलिसांना दिली असता रघूच्या पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वाशी पोलिसांनी रघूला कळवा पोलिसांच्या हातून ताब्यात घेत त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले. मात्र, या रघूचे अपहरण करणार्‍या अपहरणकर्त्याचा अद्याप शोध लागला नसून त्याच्यावर वाशी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गर्दुल्ल्याने केले होते रघूचे अपहरण
बुधवारी दुपारी रघू आपल्या आईसह वाशी रेल्वे स्टेशनजवळच्या हॉटेलमध्ये वडापाव खाण्यासाठी गेला होता. मात्र, यावेळी त्याची आईसोबत चुकामूक झाली. याचवेळी त्या भागात वावरणार्‍या एका गर्दुल्ल्याने रघूचे अपहरण केले. रघूच्या आईने त्याची सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, तो कुठेच सापडला नाही. अखेर तिने वाशी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी, वाशी रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली असता, त्यात गर्दुल्ला तरुण रघूला उचलून वाशी रेल्वे स्टेशनवर घेऊन जात असल्याचे आढळून आले.