वारजे पोलिसांनी महिलेला बार्शी येथून केले जेरबंद
वारजे : वारजे येथून अपहरण झालेल्या 11 महिन्याच्या मुलाची सुटका वारजे पोलिसांनी केली आहे. या मुलाचे अपहरण करणार्या महिलेस मुलासह बार्शी रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. मुल होत नसल्याने तिने शेजारी रहाणार्या महिलेच्या मुलाचे बिस्कीट खायला देण्याचे आमिष दाखवून अपहरण केले होते. याप्रकरणी पोलिसांनी रोहिणी उर्फ राजश्री विष्णु झोंबाडे (रा. वारजे) या महिलेला अटक केली आहे. तर श्रेयस सुरेंद्र भारती (11 महिने) असे मुलाचे नाव आहे.
मुल होत नसल्याने रोहिणीने शेजारी रहाणार्या मनिषा सुरेंद्र भारतीबरोबर ओळख वाढवली होती. यातूनच ती मुलाबरोबर खेळायची व त्याला लळा लावत होती. दोन दिवसांपूर्वी तिने मुलाला बिस्कीट खायला देते सांगून मुलाला दुकानात घेऊन गेली. मुलाच्या आईने बराच वेळ तिची वाट पाहीली. त्यानंतर तिचा शोधही घेतला. मात्र रोहिणी सापडली नाही. ती रात्रीही घरी परतली नसल्याने अखरे वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर तातडीने गुन्ह्याचा तपास हाती घेऊन आरोपी महिलेला मुलासह जेरबंद करण्यात आले. आरोपी महिला मागील वर्षभरापासून मुलाला पळवून नेण्याची संधी शोधत होती.