बारामती । बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील करंजे विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत 85 लाख रुपयांचा अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी कर्जदार सोसायटीचे सचिव आणि बँकेचे अधिकारी अशा 11 जणांवर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा बँकेचे बारामती येथील वसूली अधिकारी विठ्ठल बाळासाहेब वाघ यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार संतोष पाटोळे, अमोल वाघमारे, अजय शेंडकर, हर्षदा शेंडकर, रोहिणी शेंडकर, अरविंद शेंडकर, तुषार शेंडकर, संस्थेचे सचिव शंकर बारवकर, बँकेचे विकास अधिकारी विश्वनाथ होळकर व शाखा प्रमुख धनंजय मानसिंग गायकवाड अशा 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वरील सर्व कर्जदारांनी कर्जप्रकरणासाठी लागणारे सातबारे उतारे व ई-करार तसेच बनावट शासकीय कागदपत्र तयार करून त्यावर तलाठ्याचे खोटे शिक्के मारून सचिव शंकर बारवकर यांच्याकडे दिले.
सचिवांनी कागदपत्रांची छाननी न करता ते मंजूर केले. शाखाधिकारी धनंजय गायकवाड यांनी बँकेच्या धोरणाप्रमाणे कागदपत्रांची खातरजमा न करता कर्जदारांना मदत करण्याच्या हेतूने स्वत:ची शिफारस मुख्य शाखेकडे पाठवली. या घटनेमुळे जिल्हा बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली. या परिसरातील हा तिसरे घोटाळा असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावर सभासदांची चांगलीच नाराजी आहे.