अपहृत तरूणाला जिल्हापेठ पोलीसस्टेशन समोर सोडले

0

जळगाव : प्रॉपर्टीसाठी कानळदा येथील तरुणाचे पोलीस मुख्यालयासमोरुन रविवारी अपहरण करण्यात आले होते. मुलाच्या सुटेकेसाठी आई-वडिलांनी पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. जिल्हापेठ पोलीस स्थानकामध्ये तक्रार देण्यासाठी तरूणाचे पालक जात असतांनाच अपहरणकर्तांनी तरुणाला दुचाकीने पोलीस स्थानकासमोर सोडले. ही घटना शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील कानळदा येथे विष्णु रामदास भंगाळे हे पत्नी प्रतिभा भंगाळे, मुलगा निलेश भंगाळे यांच्यासह राहतात. विष्णु भंगाळे यांच्या नावे जळगावच्या भजेगल्लीमध्ये एक प्लॉट आहे. या प्लॉटची किंमत कोटीच्या घरात असून त्या प्लॉटची खरेदी करुन देण्यासाठी रविवारी चार ते पाच जणांनी विष्णु भंगाळे यांच्या मुलगा निलेश याचे अपहरण केल्याची घटना घडली. मात्र, मुलगा घरी न आल्याने घाबरलेल्या अवस्थेत भंगाळे दाम्पत्यांने पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांची भेट घेवून घडलेली घटना सांगितली. यावेळी पोलीस अधिक्षकांनी त्यांची आस्थवाईक चौकशी करून जिल्हापेठ पोलीसांत गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. निलेशचे आईवडील पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करण्यासाठी गेले असल्याचे अपहरणकर्त्यांना समजले. पोलीस अधिक्षकांच्या सूचनेनुसार भंगाळे दाम्पत्य जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहचले. यानंतर थोड्याच वेळात दोन दुचाकीस्वारांनी निलेशला जिल्हापेठ पोलीस ठाण्यासमोर सोडून पळ काढला.

पोलीस मुख्यलयासमोरून निलेशला उचलले
निलेश भंगाळे याला सपकाळे नावाच्या इसम फोनवरून प्रॉपर्टीसाठी धमकवित असे. त्यानुसार रविवारी भंगाळे याला सपकाळे याने धमकी देवुन जळगावात बोलाविले. भंगाळे याने मित्र जगदीश सोनवणे व मयुर राणे यांना हा प्रकार सांगितला. दोघं मित्रांसह निलेश यांनी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करण्याचे ठरविले होते . रविवारी मुख्यालयात आल्यानंतर तेथे कुणीही न भेटल्याने ते तिथेच थांबून होते. सपकाळे याचे वारंवार फोन येत असल्याने धास्ताविलेला निलेश हा मुख्यालयाच्या बाहेर आला. बसस्थानकासमोर काळ्या रंगाची कारमध्ये असलेल्या सपकाळेसह तीन ते चार जणांनी निलेशला कारमध्ये ओढले. निलेश सोबत असलेल्या जगदीश सोनवणे याला सुध्दा त्यांनी सोबत घेतले.

रायसोनीनगर परिसरात ठेवले
निलेश याला सपकाळे याने रायसोनीनगर परिसरातील तीन मजली घरात घेवुन गेला. यावेळी जगदीश याला डांबुन ठेवण्याची धमकी देत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामूळे जगदीश याने तेथून पळ काढला. दरम्यान, निलेश याची सुटका करण्यासाठी विष्णु भंगाळे यांना सपकाळेसह संशयितांनी बोलाविले. यापोटी भजेगल्लीतील प्लॉट खरेदी करुन देण्याचे त्यांना सांगण्यात आले. दिवसभर विणविण्या करुनही निलेशची सुटका होत नव्हती. शेवटी हताश झालेल्या विष्णु भंगाळे यांनी आज सकाळी पोलीस अधिक्षकांकडे आपल्यावर घडलेला प्रकार कथन केला.