चाळीसगाव : इंदिरा आवास योजनेतंर्गत सन 2010-11 ते सन 2015-16 पर्यंतची अपूर्ण घरकुले डिसेंबर-2016 पर्यंत पूर्ण न केल्यास संबंधितांकडून घरकुलांचे अनुदान वसुल करण्याबाबतची कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विक्रांत बागडे यांनी दिल्या. शहरातील सिंधी हॉल येथे नियोजीत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) राजन पाटील, गट विकास अधिकारी अनिल राणे, सहाय्यक गट विकास अधिकारी बी.एस.बागुल, नरेगाचे गटविकास अधिकारी जि.प.जळगांव चित्ते, वैद्यकीय अधिकारी डॉ.लांडे, विस्तार अधिकारी के.एन.माळी, उप अभियंता बाफणा, पंचायत समिती अंतर्गत असलेले सर्व विभाग प्रमुखांसह सर्व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैयक्तिक ग्रामपंचायत निहाय आढावा
या आढावा बैठकीत सन 2010-11 ते 2015-16 पर्यंतच्या अपुर्ण घरकुलांचा वैयक्तिक ग्रामपंचायत निहाय आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीत प्रकल्प संचालक बागडे यांनी पंचायत समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत तालुक्यातील अपुर्ण घरकुलांबाबत तात्काळ पाठपुरावा करुन संबंधितांना नोटीसा बजावण्याचे आदेशही त्यांनी या आढावा बैठकीत दिले.
ग्रामसेवकांना दिल्या सूचना
या बैठकीत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) राजन पाटील यांनी स्वच्छ भारत अभियानातंर्गत वैयक्तिक शौचालयाच्या कामकाजाबाबत आढावा घेतला असता मार्च 2017 पर्यंत कृती आराखड्यात समाविष्ट 36 गावे ओडीएफ (उघड्यावर शौचविधीपासून मुक्त) करण्याबाबतच्या सुचना उपस्थित सर्व ग्रामसेवकांना दिल्या. तसेच स्वच्छ भारत अभियानातंर्गत कृती आराखड्यात समाविष्ठ ग्रामपंचायतींव्यतीरीक्त इतर ग्रामपंचायतींनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत शौचालयाची कामे पुर्ण करण्याचे आवाहन केले.
चाळीसगावात साफसफाई अभियान जोरात
चाळीसगाव नगर परिषदेतर्फे संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानाची सुरवात नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन केली. यावेळी कार्यालयीन अधिक्षक विजय खरात, अभियंता राजेंद्र पाटील, संजय अहिरे, सचिन राजभोज, गणेश लाड, स्वच्छता निरीक्षक संजय गोयर, दिलीप चौधरींसह कार्यालयीन कर्मचारी, वॉर्ड मुकादम व सर्व सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमीत्ताने स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत कार्यक्रमाची अंमलबजावणी म्हणून सकाळी 09:00 वाजता नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णास्मृती उद्यानात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत श्रमदान स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. संपुर्ण उद्यानाची साफसफाई करुन जमा करण्यात आलेला कचरा ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलण्यात आला. या स्वच्छता मोहिमेस नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला असून या प्रमाणेच स्वच्छता अभियान यापुढेदेखील अविरतपणे सुरु ठेवण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी श्री.भालसिंग यांनी कळविले आहे.