अपूर्ण बळावर वरणगावच्या वीज वितरण कंपनीचा कारभार

0

वीज खंडित होताच कर्मचारी करतात नागरीकांच्या रोषाचा सामना ः वरीष्ठांनी दखल घेण्याची गरज

भुसावळ- 40 हजार लोकसंख्येच्या वरणगाव शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मदार वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील केवळ दहा कर्मचार्‍यांवर अवलंबून आहे. यामुळे कर्मचार्‍यांना अनेक अडचणीवर मात करीत शहरवासीयांना रात्रंदिवस वीजपुरवठ्याची सेवा पुरवावी लागत आहे.वरणगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे मात्र या कार्यालयात केवळ दहा कर्मचारी कार्यरत असल्याने या दहा कर्मचार्‍यांना आळीपाळीने रात्रंदिवस शहरातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे कर्मचार्‍यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच रात्री अचानक तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडीत होवून लवकर सुरळीत न झाल्यास कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांना नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे वीज वितरण कंपनीने याची त्वरीत दखल घेणे आवश्यक आहे मात्र वीज वितरण कंपनीकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरवासीयांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे.

सेवानिवृत्तीनंतरही भरती नाही
वरणगावच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील तीन कर्मचारी वर्षभराच्या कालावधीत सेवा निवृत्त झाले आहेत मात्र सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या जागेवर अद्यापही नवीन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली यामुळे मोजक्याच कर्मचार्‍यांवर वरणगाव शहरातील सुरळीत वीज पुरवठ्याची मदार अवलंबून आहे.

अशी आहे कर्मचार्‍यांची संख्या
वीज वितरण कंपनी कार्यालयात दहा कर्मचारी कार्यरत असून यामध्ये एक शाखा अभियंता, एक लाईनमन, सहा तंत्रज्ञ यामध्ये दोन महिला कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तर दोन विद्युत सहायक असे कर्मचारी कार्यरत असून यामध्ये तीन खाजगी आऊट सोर्सींग कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. यातील चार कर्मचारी रात्री आठ ते बारा व यानंतर चार कर्मचारी रात्री बारा ते सकाळी आठ वाजेपर्यंत सेवा बजावतात तसेच यातील कर्मचारी दिवसा साप्ताहीक सुटी घेत असल्यामुळे दिवसा कर्मचार्‍यांचे संख्याबळ अपूर्ण पडते.

किमान 20 कर्मचार्‍यांची आवश्यकता
वरणगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता वीज वितरण कंपनीने किमान 20 कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. यामध्ये दोन लाईनमन असणे गरजेचे आहे तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांच्या रीक्त जागांवर त्वरीत कर्मचार्‍यांची नियुक्ती केल्यास शहरातील नागरीकांच्या विजेच्या समस्या त्वरीत मार्गी लागण्यास मदत होईल. यासाठी लोकप्रतिनिधींनी वरीष्ठांकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.