अप गीतांजली एक्स्प्रेसचा अपघात टळला ; रेल्वे कर्मचार्‍यांची सतर्कता

0

एक्सल जामनंतर भुसावळ स्थानकावर डबा बदलला ; दोन तासांच्या विलंबाने गाडी रवाना

भुसावळ- अप 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेसचा सीएनडब्ल्यू विभागातील रेल्वे कर्मचार्‍यांनी अपघात टळल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. बोगी क्रमांक एस- 3 चा एक्सल तापल्याने डब्याला आग लागण्याची वा डबा रेल्वे रूळाखाली घसरण्याची शक्यता होती मात्र सतर्क सीएनडब्ल्यू विभागाच्या कर्मचार्‍यांनी तातडीने वरीष्ठांना माहिती दिल्यानंतर हा डबा गाडीपासून वेगळा केल्यानंतर दुसरा डबा जोडून गाडी पुढील प्रवासाला रवाना करण्यात आली. दरम्यान, आधीच साडेतीन तास विलंबाने धावत असलेल्या गाडीला भुसावळात आणखी दोन तास विलंब झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

सीएनडब्ल्यू कर्मचार्‍यांची सतर्कता
अप 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस गुरुवारी दुपारी 4.20 वाजेच्या सुमारास प्लॅटफार्म क्रमांक एकवर येत असताना बोगी क्रमांक एस- 3 चा एक्सल सुमारे 102 अंशावर तापल्याचे सीएनडब्ल्यू विभागाचे कर्मचारी गजेंद्र सनस व मनोज जनार्दन चौधरी यांच्या लक्षात येताच त्यांनी वरीष्ठांना माहिती दिली. रेल्वेच्या अधिकार्‍यांना याबाबतची माहिती कळताच त्यांनी धाव घेतली तर गीतांजलीला दुसरी स्लीपर बोगी लावून गाडी रवाना करण्यात आली. दरम्यान, गाडीची भुसावळची नियोजित वेळ दिड वाजेची असलीतरी ही गाडी आधीच साडेतीन तास विलंबाने 4.20 ला दाखल झाली तर डबा बदलाच्या प्रक्रियेत तब्बल दोन तासांचा विलंब झाल्याने प्रवासी चांगलेच संतप्त झाले होते तर 6.20 वाजेच्या सुमारास ही गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली.