अफगाणिस्तानच्या मोहम्मदने तोडला विराटचा विक्रम

0

अबूधाबी : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावे नेक विक्रम आहेत. जेव्हा विराट कोहली मैदानावर उतरतो तेव्हा एखादा तरी विक्रम मोडला जातो किंवा रचला जातो असे म्हटले जाते. परंतु विराट कोहलीचाच विक्रम एका क्रिकेटवीराने मोडल्याने सध्या त्याची चर्चा सुरू आहे. विराट कोहलीचा एक विक्रम अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादने मोडला आहे. सध्या शहजादच्या नावे एका आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेमध्ये सर्वाधिक अर्धशतके करण्याचा विक्रम आहे. विराट कोहलीच्या नावावर तीन अर्धशतके होती. शहजादने एका मालिकेमध्ये चार अर्धशतके करुन विराटचा विक्रम मोडला आहे.

एकाच दिवसात दोन अर्धशतके
विराट कोहलीने मागील टी-२० विश्वचषकामध्ये ३ अर्धशतके केली होती. शहजादने आयर्लंडविरुद्ध अर्धशतक करुन त्याचा हा विक्रम मोडला आहे. नुकताच दुबईमध्ये झालेल्या डेसर्ट टी-२० चॅलेंजमध्ये त्याने हा विक्रम बनवला आहे. इतकेच नव्हे तर एकाच दिवसात दोन अर्धशतके बनवणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. ओमानविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात शहजादने ८० धावा केल्या आणि त्याच दिवशी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने आयर्लंडविरुद्ध अर्धशतक केले. त्याच्या या खेळाच्या प्रदर्शनाच्या जोरावरच अफगाणिस्तानने हा चषक जिंकला आहे. गेल्या वर्षीपासून अफगणिस्तानचा संघ चांगले प्रदर्शन करीत आहे. अफगणिस्तानने या पूर्ण चषकामध्ये एकही सामना गमवला नाही. आयर्लंडविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात अफगणिस्तानने १० विकेटनी विजय मिळवला.