अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 57 ठार

0
अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 57 ठार
मतदार, ओळखपत्र नोंदणी कार्यालयाबाहेरील घटना
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये मतदार आणि ओळखपत्र नोंदणी कार्यालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 57 जण ठार तर 119 हून अधिक जखमी झाले. या हल्ल्यामुळे देशात 20 ऑक्टोबर रोजी होणार्‍या निवडणुकांसाठी सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे. हा स्फोट केंद्राच्या प्रवेशद्वारावर घडला. हा आत्मघातील हल्ला होता. त्यात अनेकांचा बळी गेला, असे काबूल पोलिसांचे प्रमुख दाऊद अमीन यांनी सांगितले. तर सध्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
निवडणुकांमध्ये सुरक्षा चिंतेचा विषय
या केंद्रावर नागरिकांच्या राष्ट्रीय ओळखपत्रांची नोंदणी करण्यात येते. हल्ल्याचे नव्याने लक्ष्य बनवण्यात आलेले हे केंद्र काबूल शहराच्या पश्चिमेतील शियाबहूल भागात आहे. अफगाणिस्तानामध्ये दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या निवडणुकांसाठी 14 एप्रिलपासून नोंदणी सुरू करण्यात आली होती. या निवडणुकांमध्ये सुरक्षा व्यवस्था हा चिंतेचा विषय ठरणार असल्याची भीती निवडणूक अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.