दोंडाईचा । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श जपा, मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही. माणुसकी जपा राष्ट्रपुरूषांचे विचार आचरणात आणा. काही समाजकंटक जाती-जातीमध्ये मतभेद निर्माण करतात. पण अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन नायब तहसिलदार वारूडे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त दोंडाईचा पोलीस स्थानकात शांतता कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीत जयंतीप्रसंगी येणार्या अडचणी, सुविधा व सुरक्षेवर चर्चा करण्यात आली.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
बैठकीत रामभाऊ माणीक यांनी, ग्रामीण भागात जयंतीदिनी पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी केली तर कृष्णा नगराळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीनुसार सर्व धर्म समभाव जपत शांततेच्या मार्गाने, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेवुन मिरवणुक शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. डिवायएसपी संदिप गावीत यांनी, प्रेम व एकोप्याने कार्यक्रम साजरा करावा तसेच गालबोट लावणार्यांना वेळीच सावध करा, असे आवाहन केले.
यांची होती बैठकीला उपस्थिती
दोंडाईचा पो.स्टे.चे सपोनि. डिंगबर पाटील यांच्यावतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत हे होते तर व्यासपीठावर नायब तहसिलदार रोहीदास वारूळे, दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ललीतकुमार चंद्रे, सपोनि. डिंगबर पाटील, पीएसआय निलेश मोरे, पीएसआय पठाण उपस्थित होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने माजी नगरसेवक रामभाऊ माणीक, मक्कन माणीक, कृष्णा नगराळे, दादाभाई कापुरे, मनोहर कापुरे, रवि अहिरे, फकिरा थोरात, राहुल माणीक, शिवा नगराळे, विजय मराठे, चेतन राजपूत, शैलेश सोनार, मनोहर देवरे, राकेश राजपूत, जयपालसिंह गिरासे, कैलास राजपूत, विजय मराठे उपस्थित होते.