पुणे : गोवर-रुबेला लसीकरण ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी अत्यावश्यक असून गोवर, रुबेलामुळे आरोग्यावर होणारा परिणाम अत्यंत घातक आहे. या लसीमुळे हे धोके टाळता येतील. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने केले आहे. ही मोहिम मुलांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाची असल्याचे ‘आयएमए’ च्या वतीनं सांगण्यात आले आहे.
राज्यात सर्वत्र गोवर-रुबेला लसीकरण मोहिम सुरू असून ही मोहिम सुरू झाल्यानंतर त्याचा काही मुलांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून येऊ लागल्या आहेत. पुण्यातही असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अनेक पालकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काही पालक मुलांना लस देण्यास टाळाटाळ करत आहेत. खासगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन लस देण्याबाबत विचारणा केली जात आहे. या पार्श्वभुमीवर ‘आयएमए’ने पुढाकार घेत लसीकरणाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आयएमएच्या महाराष्ट्र शाखेने मोहिमेला पुर्णपणे सहकार्य केले आहे. सर्व २१० शाखा आणि ४३ हजार ९० सदस्य त्यासाठी कार्यरत आहेत.
‘आयएमए’ने लसीकरणाबाबतच्या तथ्य आणि मार्गदर्शक तत्वांवर प्रकाश टाकला आहे. त्याद्वारे लसीबाबतचा संभ्रम दुर होण्यास मदत होणार आहे. अशीच मोहिम इतर राज्यांमध्येही यशस्वीपणे राबविण्यात आली असून आता ही मोहिम महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेला विरोध न करता सहकार्य करण्याची गरज आहे. अशास्त्रीय आणि समाजविघातक अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन आयएमए पुणेच्या अध्यक्षा डॉ. पद्मा अय्यर यांनी केले आहे.