अफवा व धार्मिक भावना भडकाविल्याप्रकरणी जिल्ह्यात ५ गुन्हे दाखल

0

जळगाव : अफवा व धार्मिक भावना भडकाविल्याप्रकरणी जिल्ह्यात जळगाव तालुका, एमआयडीसी, चोपडा ग्रामीण, पाचोरा व अमळनेर येथे असे एकुण पाच गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलीस अधीक्षकांच्याच निरिक्षणास आला प्रकार

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोस्ट व व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी मनोज दिलीप सपकाळे (३१,रा.आव्हाणे, ता.जळगाव) याच्याविरुध्द शनिवारी तालुका पोलिसात तर गणेश दगडू घोपे (५०, रा.मेहरुण) याच्याविरुध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय पाचोरा, अमळनेर, चोपडा येथेही प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे. अमळनेर येथे तर पोलीस निरीक्षक गृप अ‍ॅडमिन असलेल्या गृपवरच आक्षेपार्ह पोस्ट आल्याने संबंधित व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पोलीस अधीक्षकांच्याच निदर्शनास आला हे विशेष.

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादृर्भाव होवू नये, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती सुध्दा करण्यात येत आहे.जनजागृती करीत असतांना समाजातील काही व्यक्ती सोशल मिडीया, फेसबुकव्दारे कोरोना रोगाच्या अनुषंगाने दोन धर्मात, दोन जातीत तेढ , तिरस्कार निर्माण होईल असे संदेश प्रसारित करीत आहेत. कोणीही समाज भावना भडकवणा-या पोस्ट्स, अफवा सोशल मिडीया आणि व्हाटसअ‍ॅप सारख्या इतर अँपव्दारे पसरविणा-या विरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस दलाने दिला आहे.

सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट व वक्तव्ये करणा-यावर जिल्हा पोलीस दल लक्ष ठेवून आहे. अशा पध्दतीच्या पोस्ट, आॅडिओ, व्हिडीओ, मेसेज प्राप्त झाल्यास त्यावर विश्वास न ठेवता त्या त्वरीत डिलीट कराव्यात व नजीकच्या पोलीस स्टेशन अथवा कंट्रोल रुम यांना कळवावी. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक