अब्रू वाचविण्यासाठी तिने पहिल्या मजल्यावरून उडी मारली

0

मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न
रहाटणीतील धक्कादायक घटना, महिलेचा पाय मोडला

पिंपरी-चिंचवड : पती घरी नसल्याची संधी साधून एका नराधमाने विवाहितेच्या घरात मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घुसून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सदर विवाहितेने अब्रू वाचविण्यासाठी पहिल्या मजल्यावरील बेडरुमच्या गॅलरीतून खाली उडी घेतली व आरडाओरड केली. ती खाली उभ्या असलेल्या कारवर कोसळल्याने तिचा पाय मोडला असून, बोटेही तुटली आहेत. घटनास्थळी रहिवासी जमा झाल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले तर नराधम पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहाटणी येथे ही धक्कादायक घटना घडली. कालच नालासोपारा येथे एका मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला असता, तिने इमारतीतून उडी घेण्याचा प्रकार घडला होता. सलग दुसर्‍या दिवशी अशी घटना घडल्याने राज्यातील महिला सुरक्षित नसल्याची बाब चव्हाट्यावर आली आहे. सद्या संबंधित विवाहितेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

रहाटणीत एकच खळबळ
रहाटणी येथील महाराष्ट्रनगरातील 30 वर्षीय विवाहितेचा एकटीच घरी होती. ती संधी साधून नराधमाने तिच्या घरात घुसखोरी केली. तसेच, तिला अश्‍लील व लज्जास्पद बोलत तिचा विनयभंग केला. तसेच, तिच्यावर बलात्काराचाही प्रयत्न केला. सदर विवाहितेचे आरडाओरड केली असता, कुणीही धावून आले नाही. त्यामुळे तिने बेडरुमच्या गॅलरीतून खाली उडी घेतली. त्यात तिची उडी खाली उभ्या असलेल्या कारवर पडली. त्यामुळे तिचा उजवा पाय मोडला व हाताची बोटेही तुटली आहेत. घटनास्थळी जमलेल्या जमावाने तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर संबंधित नराधम पळून गेला होता. याबाबत सदर विवाहितेने वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नराधमाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या विवाहितेच्या माहितीनुसार, राजपूत नावाच्या इसमाने तिच्या पतीला मोबाईल काढून घेतला होता. तो परत मिळविण्यासाठी तिचा पती त्या इसमाकडे गेला होता. तर त्याने मोबाईल दुसर्‍याला दिल्याचे सांगून पीडितेच्या पतीला रहाटणीपासून दूर अंतरावर नेले होते व तेथेच थांबवून ठेवले. त्यानंतर अज्ञात इसम घरात घुसून संबंधित विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न करू लागला होता. याप्रकरणी वाकड पोलिस पुढील तपास करत आहेत.