नवी मुंबई । महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे बेपत्ताप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ठाणे सुरक्षा शाखेमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी गुरुवारी अभय कुरुंदकरला अटक करण्यात आली. पनवेल पोलिसांनी ठाण्यातून अभय कुरुंदकरला अटक केली होती. न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अश्विनी बिद्रे यांचे वडील जयकुमार बिद्रे यांनी उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास करण्यात पोलीस टाळाटाळ करत असल्याची तक्रार केली होती. अभय श्यामसुंदर कुरुंदकर यांनी घातपात केला असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. अखेर पोलिसांनी कारवाई करत अभय कुरुंदकरला अटक केली. पण पोलिसांना कारवाईसाठी दीड वर्षे का लागली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता प्रकरण गेल्या दीड वर्षापासून राज्यभर गाजत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरही संशयित आरोपी कुरुंदकरला अटक करण्यात आली नव्हती. या प्रकरणाचा नातेवाइकांनी पाठपुरावा केला होता. अश्विनी रत्नागिरीमध्ये असताना कुरूंदकर तिला भेटायला यायचा. त्यादरम्यान, त्यांच्यामध्ये भांडणे होऊ लागली होती. भांडणाचे व्हिडिओ तयार करून अश्विनीने ते तिच्या संगणकावर जतन करून ठेवले होते. घरातील सीसीटीव्हीमध्ये दोघांच्या प्रेमाचे व भांडणाचे संवाद चित्रीत झाले आहेत. याविषयी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ठाणे सुरक्षा शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या अभय कुरुंदकरला अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड करत आहेत.
मारहाणीचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती
बेपत्ता सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे हिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मारहाण करत असल्याचा व्हिडिओ नातेवाइकांनी पोलिसांकडे दिला आहे. त्या व्हिडिओमध्ये रत्नागिरीमधील घरामध्ये कुरुंदकर अश्विनीचा गळा दाबत असल्याचा व हाताने बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तिच्या हातामधील मोबाइलही हिसकावून घेतल्याचे दिसत आहे. इतरही अनेक व्हिडिओ तिच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे दिले आहेत.