आज भलेही काँग्रेसजण पक्षाच्या दुर्दशेवर अश्रू ढाळत असतील; परंतु देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य देणार्या या पक्षाचे देशनिर्मितीतील योगदान विसरता येणारे नाही. स्वातंत्र्यपूर्व असो, की स्वातंत्र्योत्तर कालखंड असो, या देशाच्या जडणघडणीत या पक्षाचे योगदान मोठे आहे. आज जेव्हा खोटे बोलून सांप्रदायिक शक्ती सत्तेवर आल्यात अन् त्यांनी या देशाला अधोगतीकडे नेले, तेव्हा देशातील प्रत्येकाला आता काँग्रेसची गरज तीव्रतेने भासू लागली आहे. पक्षाला ऊर्जितावस्था देण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर असले तरी, काँग्रेस ही भारताची विचारधारा आहे अन् ही विचारधाराच राहुल यांना हे आव्हान पेलण्याचे सामर्थ्य निश्चितपणे प्रदान करेल. अध्यक्षीय कारकिर्दीसाठी राहुल यांचे अभिनंदन व शुभेच्छा!
साधारणतः 134 वर्षांची राजकीय परंपरा लाभलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची अगदी अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली आहे. देशाच्या सत्तेत बहुतांश काळ राहिलेल्या या पक्षाला आज ज्या सामाजिक, राजकीय परिस्थितीचा सामना करावा लागतो, ती बाब पाहाता राहुल यांच्यासमोर नेतृत्वाचे मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे. देशाच्या स्वातंत्र्याची लढाई म्हटले, की काँग्रेस आठवते. काँग्रेस म्हटले की महात्मा गांधी आठवतात. म्हणून, काँग्रेस हे केवळ राजकीय पक्षाचे नाव नाही; तर ते या देशाचा श्वास आहेत, सर्वसामान्यांना आपला वाटणारा सर्वात मोठा समूह आहे. 28 डिसेंबर 1885 रोजी ए. ओ. ह्यूम या ब्रिटीश प्रशासकाने या पक्षाची स्थापना केली होती. ब्रिटिशांकडून भारतीयांना मर्यादित स्वायत्तता मिळवून देणे हा त्यामागचा उद्देश होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांनी काँग्रेस विसर्जित करण्याचा आग्रह धरला होता. देशच स्वातंत्र्य झाला आहे तर मग् काँग्रेसची गरज काय? असा गांधीजींचा विचार होता. परंतु, तत्कालिन काँग्रेस धुरिणांनी हा विचार फेटाळला. कालौघात काँग्रेसचे रुप बदलले, विचारही बदलला अन् हा पक्ष देशाचा चेहरा बनला. स्वातंत्र्योत्तर काळात तर काँग्रेस म्हणजे गांधी विचार अशी या पक्षाची ओळखच बनली होती, आजही या देशातील बहुसंख्य लोकांना हीच ओळख माहित आहे. या पक्षाचे तरुण अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्याकडे भलेही पाहिले जाईल, परंतु पक्षाची परंपरा आणि विचार पुढे नेताना राहुल यांना खूप संघर्ष आणि कष्ट करावे लागणार आहेत. छद्मी, देशाच्या प्रतिमेला तडे जाणारे, आणि विविधतेतील एकता नष्ट करण्यासाठी भलावन करणारे विचार जेव्हा या देशात मजबूत होताना दिसत आहेत, दोन जाती, दोन धर्म आणि दोन माणसांत द्वेष पसरविणारे विषारी विचारांचे जेव्हा उदात्तीकरण केले जात आहे, अन् लोकभावनेला खोटे बोलून, निव्वळ स्वप्ने दाखवून सत्ता हस्तगत केली गेली आहे, तेव्हा अशा विषम परिस्थितीत काँग्रेसला ऊर्जितावस्था, पुनर्यश प्राप्त करून देण्याची जबाबदारी राहुल यांच्या खांद्यावर येवून पडलेली आहे. ही जबाबदारी म्हणावी तितकी सोपी नाही, याची जाणिव कदाचित राहुल गांधी यांनाही असावी.
सत्यमेव जयते हे या देशाचे ब्रिद आहे. अखेर सत्याचाच विजय होतो. सत्याचा विचार हीच गांधीजींची शिकवण होती. सत्ता ही गोरगरिबांसाठी राबवायची असते, हे गांधी आवर्जुन सांगत असतं. तेव्हा या सत्याच्या मार्गाने राहुल यांनी वाटचाल केली तर ते काँग्रेसला पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यात निश्चितच यशस्वी होतील, त्याबद्दल आम्हाला पूर्णपणे खात्री वाटते. या देशात मोदी लाट आणण्यात आली. परंतु, मोदी लाट हा भस्मासूर होता, त्याचे दुष्पपरिणाम आज देशाला भोगावे लागत आहेत. व्यापार-उदिम, उद्योग, सेवाक्षेत्र आणि शेती पूर्णपणे अडचणीत सापडलेली आहे. एक अविचारी निर्णय किती घातक ठरू शकतो? याचा अनुभव आता प्रत्येकाला येऊ लागला आहे. ज्या आशेने लोकांनी मोदींना मते दिली आणि बहुमताने सत्ताही दिली, त्याच आशेवर पाणी तर फेरले गेलेच; परंतु या देशाचा वर्तमान आणि भविष्यकाळ बरबाद झालेला आता प्रत्येकाला दिसू लागला आहे. त्यामुळेच वाट काटेरी असली तरी मोदी नावाचे आलेले वादळ सरत आले आहे, आणि त्यातून उद्ध्वस्त होणारा देश सावरण्यासाठी प्रत्येक देशवासीय राहुल गांधी यांना नक्कीच ताकद देण्यासाठी सरसावलेला दिसेल, याचीही आम्हाला खात्री वाटते. वर्तमान कठीण वाटत असला तरी राहुल यांच्यासाठी भविष्यकाळ नक्कीच उज्वल असेल, याबाबत कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. राहुल यांच्या निवडीने काँग्रेसमधील घराणेशाहीवर टीका होऊ शकते. परंतु, आजच्या परिस्थितीत राहुल हीच काँग्रेसची गरज आहे, हेही सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. विचार, कृती आणि धोरण याबाबतीत परिपक्वता आलेले राहुल गांधी यांना वगळून आजतरी काँग्रेसकडे नेतृत्व म्हणून कुणाकडे पाहाता येत नाही, असे अन्य नेतृत्व पुढे केले गेले तरी देश त्यांना स्वीकारलेच याची काहीही शाश्वती देता येत नाही.
काँग्रेस नेतृत्वाचा विचार करता सोनिया गांधी यांनीच काँग्रेसचे सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषविले अन् त्यांच्याच कार्यकाळात काँग्रेसला प्रदीर्घकाळ सत्ताही लाभली. नेहरू-गांधी घराण्यातील कोणत्याही नेत्यापेक्षा, अगदी इंदिरा गांधी यांच्यापेक्षाही काँग्रेसचे सर्वातकाळ नेतृत्व सोनिया यांच्याकडे होते. 134 वर्षाच्या काँग्रेसच्या कार्यकाळात 41 वर्षे या पक्षाचे अध्यक्षपद नेहरू-गांधी घराण्याकडे आहे, आताही राहुल यांच्या निमित्ताने नेतृत्व पुन्हा याच घराण्याकडे ते आलेले आहे. मोतीलाल नेहरू यांना 1919 मध्ये अमृतसर येथील अधिवेशनात काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. ते 1920 पर्यंत अध्यक्ष होते. 1929 मध्ये ते पुन्हा अध्यक्ष झाले. लाहोर अधिवेशनात त्यांचे सुपुत्र पंडित जवाहरलाल नेहरू यांना अध्यक्ष बनविण्यात आले. त्यानंतर सलग सहावेळा त्यांची या पदावर वर्णी लागली होती. अगदी 1954 पर्यंत नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1959 मध्ये इंदिरा गांधी या काँग्रेस अध्यक्षा बनल्यात, 1960 पर्यंत त्या अध्यक्षा होत्या. 1978लाही त्याच अध्यक्षा झाल्यात. इंदिराजींच्या हत्येनंतर 1984 मध्ये राजीव गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष बनविण्यात आले. 1991 पर्यंत ते अध्यक्ष होते. राजीव यांच्या निधनानंतर अनेक वर्षे या परिवारातील कुणीही अध्यक्ष बनू शकले नाही. 1998 मध्ये सोनिया गांधी यांना अध्यक्ष बनविण्यात आले, त्या आता या पदावरून पायउतार होतील व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेस अडचणीत असते तेव्हा या पक्षाचे अध्यक्षपद नेहरू-गांधी परिवारातील सदस्याकडे दिले जाते. आताही काँग्रेस कमालीची अडचणीत आहे. मोदी-शहा या जोडगोळीने काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी वाटेल ते करण्याची या जोडगोळीची तयारी आहे. त्यामुळे या देशातील लोकशाही प्रक्रियाच धोक्यात आलेली आहे. या देशाचे संविधान बनविण्यापासून ते प्रत्येक व्यवस्थेवर काँग्रेसची छाप आहे. या देशाची राजकीय मुळेच काँग्रेसशी जोडली गेलेली आहेत. त्यामुळे देशातील सद्याचे वातावरण हे देशाच्या लोकशाहीवरील मोठा आघातच म्हणावा लागेल. सांप्रदायिक शक्ती जेव्हा डोके वर काढून लोकशाही गिळंकृत करू पाहात आहेत, तेव्हा नेहरू-गांधी वंशातील राहुल यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व येणे हा शुभशकुनच म्हणावा लागेल. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त होवो, पंतप्रधान म्हणून सोनेरी कारकीर्द गाजविण्याचे राजीव गांधी यांचे अधुरे स्वप्न राहुल यांनी पूर्ण करोत, अशा आम्ही त्यांना सहर्ष शुभेच्छा देत आहोत!