अभिनयातील भूमिका खऱ्या आयुष्यात नसते- नवाजुद्दीन सिद्दीकी

0

मुंबई: बॉलीवूडचा उत्कृष्ट अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. सध्याच्या घडीला तो चर्चेत आहे ते म्हणजे नेटफ्लिक्सवरच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमुळे.

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी ‘सेक्रेड गेम्स’मध्ये अक्षेपार्ह विधानं असल्यामुळे त्याविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी खुप काही बोललं जातं. पण सध्या भारतामध्ये मात्र यावरही काही मर्यादा आल्या आहेत, ज्याचा सामना कलाकारांना करावा लागतो, याविषयी तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आला.

यावेळी ‘सेक्रेड गेम्स’मधीलही त्याच्या भूमिकेचा संदर्भ देण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत नवाज म्हणाला, ‘ती एक वेब सीरिज होती आणि मी साकारलेली भूमिका ही एक प्रकारचं काल्पनिक पात्र होतं. मी फक्त त्यासाठी अभिनय केला होता. प्रत्येक गोष्टीत कलाकारांनी हस्तक्षेप करणं हे चुकीचं ठरेल किंबहुना ती माझी जबाबदारीच नाही. कारण, निर्माता- दिग्दर्शकांच्या विरोधात मी जाऊ शकत नाही. मी फक्त एक भूमिकाच साकारत होतो.’ मी जो अभिनय केला ती माझी खऱ्या आयुष्यातीलही भूमिका असेल असं नाही हेसुद्धा त्याने स्पष्ट केलं. राजीव गांधी यांच्याविषयीच्या त्या वक्तव्याविषयी सांगत नवाज म्हणाला की, मी व्यक्तीगतपणे त्यांचा खुप जास्त आदर करतो. मुळात मी त्या पदाचा आदर करतो.