अमित महाबळ: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीतही विरोधक चीतपट होऊन शत-प्रतिशत भाजपा थोडक्यात महायुती सत्तारूढ होण्याची स्वप्ने पाहणार्यांना शरद पवारांमुळे जोरदार धक्का बसला आहे. पवारांचे राजकारण इतिहासजमा झाल्याचे म्हणणार्यांना यामुळे जबरदस्त चपराक बसली आहे, असे मानायला हरकत नाही. ज्येष्ठ तरीही मनाने आणि शरीराने तरुण असलेल्या या नेत्याने आपली ताकद सर्वार्थाने पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
भाजपाने राष्ट्रवादाशी निगडीत कलम 370 चा प्रमुख मुद्दा उचलून धरत महाराष्ट्रातील निवडणूक लढविली तरीही त्यांना अपेक्षित यश साध्य करता येत नसेल, तर नक्की कुठे चुकले याची कारणमीमांसा या पक्षाने करणे आवश्यक झाले आहे. वास्तवातील मुद्दे नजरेतून दुर्लक्षित झाले का? याचाही विचार नागपूर, मुंबई, कोल्हापूर व दिल्लीतील नेत्यांनी करायला हवा.
2014 च्या विधानसभा निवडणुकीतील उल्लेखनीय यशाची पुनरावृत्ती आताच्याही विधानसभा निवडणुकीत होईल अशी अपेक्षा भाजपाला होती. त्यासाठीची मोर्चेबांधणी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सुरुंग लावण्यात आले. या दोन्ही पक्षातील दिग्गज नेत्यांना शिवसेना व भाजपात सामावून घेण्याची खेळी खेळण्यात आली. या जाळ्यात पवारांचे जवळचेही आणि विश्वासूही अडकले. एक-एक करून बरेच जण पवारांना सोडून गेले. यथावकाश ‘ईडी’चे भूत बाटलीतून बाहेर निघाले आणि राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. हे भूत पवारांच्या मानगुटीवर बसते की, काय अशी शंका निर्माण झालेली असतानाच त्याच्याच मागे लागून या भूताला पळवून लावण्याचे काम शरद पवारांनी करून दाखविले. परंतनु, या दरम्यान पवारांचे पुतणे अजित पवार यांनी अचानक राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा वारे फिरले. राष्ट्रवादीच्या बाजूने आलेली सहानुभूतीची लाट ओसरली. अशा स्थितीत भाजपा व शिवसेना नेत्यांचा महायुतीच्या विजयाबद्दलचा आत्मविश्वास अधिकच दुणावला. महायुती 288 पैकी 220 च्या पार जाणार अशी भाकिते भाजपाच्या नेत्यांकडून केली जाऊ लागली.
खरे तर ही निवडणूक शरद पवारांसाठी अस्तित्त्वाची लढाई होती. आता नाही तर कधीच नाही. गलितगात्र पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे आव्हान त्यांनी हिंमतीने पेलले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील फूट, गट-तट, सरकारी यंत्रणांकडून चौकशी होण्याचे सावट, कुटुंबांतर्गत संघर्ष आणि महत्त्वाचे म्हणजे वय हे सर्व मुद्दे लक्षात घेतल्यास एखादा नेता खचला असता परंतु, शरद पवार डगमगले नाहीत. त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. सातार्यात भर पावसात घेतलेल्या सभेने या सर्वांवर कडी केली. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकूण 100 पेक्षा अधिक प्रचारसभा होतात तर दुसरीकडे शरद पवार खंबीरपणे राज्यभरातील निवडणुकांची खिंड लढवितात हे उल्लेखनीय म्हणावे लागेल. निवडणुकीचे निकाल पाहता भाजपाच्या केंद्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांनी ‘अब की बार 220 पार’चे जे आभासी चित्र उभे केले होते? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. पवारांना संपविणे सोपे नाही हे स्वतः शरद पवारांनी पुुन्हा एकदा दाखवून दिले आहे. परंतु, या लढाईतील एक उणीव प्रकर्षाने जनरेत भरण्यासारखी आहे. काँग्रेसने अजून पाठबळ, भक्कम साथ दिली असती तर आघाडीच्या जागा आणखी वाढण्याची शक्यता होती. असो, महायुतीने रचलेल्या चक्रव्यूहात शिरून तो भेदण्याचे शौर्य शरद पवारांनी दाखविले आहे. त्यामुळेच विधानसभेच्या लढाईत ‘अभिमन्यू जिंकला’ असे म्हणणे संयुक्तिक ठरू शकते.